साहित्य: अर्धा कप पांढरी उडीद डाळ, पाव कप बारिक किसलेलं किंवा काप केलेलं सुकं खोबरं, 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा कप कोथिंबीर नाजूक हिरव्या देठांसह, 4 टीस्पून जिरं, 7-8 कढीपत्त्याची पानं, चिंचेचे 2-3 तुकडे, 1 टेबलस्पून बारिक चिरलेला गूळ, अर्धा कप बारिक चिरलेला कांदा, 1 टीस्पून मोहोरी, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून गोडा मसाला/गरम मसाला/काळा मसाला, सैंधव, तेल
कृती: प्रथम उडदाची डाळ गुलाबी-लालसर रंगावर भाजून घ्यावी.
कुकरच्या भांड्यात गरम डाळ ओतून त्यात डाळ बुडेल इतपत पाणी घालावे आणि 15 ते 20 मिनिटे डाळ भिजू द्यावी. त्यानंतर डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
आता आलं, लसूण, 2 टीस्पून जिरं, खोबरं, मिरची, कोथिंबीर, 4 कढीपत्त्याची पानं, चिंच हे सगळं मिक्सरवर जाडसर वाटून घ्यावं. त्यातच शिजलेल्या डाळीतली अर्धी डाळ घालून या वाटणा सोबत ती सुद्धा वाटून घ्यावी. अर्धी डाळ बाजूला काढून ठेवावी.
कढई मध्ये तापलेल्या तेलात मोहोरी तडतडल्या नंतर 2 टीस्पून जिरं, हिंग, कढीपत्त्याची उरलेली पानं आणि कांदा घालून सगळं परतून घ्यावं. कांदा मऊ झाल्यावर त्यात डाळ व हिरव्या वाटणाचे मिश्रण घालून थोडंस परतून घ्यावं.
आता या मिश्रणात थोडं पाणी घालावं आणि बाजूला काढून ठेवलेली डाळ घालून घ्यावी. मिश्रण ढवळत रहावं नाहीतर वाटण कढईत खाली चिकटून जळू लागते. वाटण, पाणी व डाळ एकजीव झाली की त्यात हळद, गोडा मसाला, सैंधव आणि गूळ घालून एक उकळी फुटू द्यावी.
उडदाच्या डाळीची गरमागरम पौष्टिक आमटी तयार. हिवाळ्यात खाण्यासाठी अतिशय उत्तम. याच पद्धतीने काळ्या उडदाच्या डाळीची आमटी सुद्धा करू शकता.
तुम्हाला माहिती आहे का?
असेच छान चविष्ट पदार्थ खाऊनसुद्धा डायट करता येते आणि आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी होऊ शकते?