साहित्य: पाव कप मूग, पाव कप मटकी, २ टेबलस्पून हरभरे, २ टेबलस्पून काबुली चणे, १ टेबलस्पून मसूर, २ टेबलस्पून चवळी, १ कप जाड चौकोनी चिरलेला कांदा, १ कप बारीक चिरलेला टोमॅटो, १ अख्खा लसूण, १ इंच आलं, ५-६ आमसुलं (कोकम), २ तमालपत्र, १ इंच दालचिनीचा तुकडा, १०-१२ मेथी दाणे, १ टीस्पून मोहोरी, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून हिंग, ८-१० कढीपत्त्याची पानं, १ टीस्पून हळद, २ टीस्पून लाल मिरची पूड, १/३ कप तेल, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून सैंधव, जाडे मीठ चवीनुसार.
कृती: सकाळी सगळी कडधान्य स्वच्छ धुवून भिजत घाला. रात्री उपसून चाळणीत झाकून ठेवा किंवा फडक्यात बांधून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उसळ करण्यापूवी पुन्हा एकदा धुवून घ्या.
कढईत तेल तापले की मोहोरी घाला. मोहोरी तडतडली की तमालपत्र, दालचिनी, मेथी दाणे, जिरे, हिंग, कढीपत्ता घाला. आता फोडणीत कांदा घालून मऊ होईपर्यंत परतवून घ्या. त्यावर टोमॉटो घालून तो ही परतवून घ्या. आता हळद, लाल मिरची पूड घाला आणि नीट हलवून घ्या.
धुतलेली कडधान्य घालून नीट हलवून घ्या आणि झाकण ठेऊन एक वाफ काढा. एकीकडे २ ग्लास पाणी गरम करायला ठेवा.
पाणी तापलं की ते उसळीत घाल. आता उसळीत आमसूल आणि जाडसर कुटलेले आलं लसूण घाला. चांगली उकळी फुटली की सैंधव आणि मीठ घाला. उसळ शिजल्यावर गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला आणि परत थोडा वेळ झाकण ठेवा.
उसळ वाढताना त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि वरून थोडी कोथिंबीर घालून द्यावी. सोबत लिंबू पण असावे. आवडत असल्यास बारीक शेवही घालू शकता.
वर दिलेल्या प्रमाणात केल्यास साधारणपणे ५-६ माणसांना पुरेल इतकी उसळ तयार होते.