साहित्य: 1 कप राजगिरा पीठ, 8 टेबलस्पून तूप, 2 टेबलस्पून डिंक, 20-25 मखाणे, 2 टेबलस्पून खसखस, 10-12 काळ्या खजूराचे बारिक तुकडे केलेले, एक कप भाजलेले शेंगदाणे, 10 बदाम, 1 टीस्पून वेलची पूड, 1/4 टीस्पून जायफळ पूड, अर्धा कप बारिक चिरलेला गूळ, 2 कप खवा, 1 कप मिल्क पावडर, 1 कप बारिक किसलेलं खोबरं
कृती: तापलेल्या जाड बुडाच्या कढईत 2 टेबलस्पून तूप गरम करून घ्या. तूप तापल्यावर मध्यम आचेवर डिंक तळून घ्यावा. तळलेला डिंक एका मोठ्या ताटात काढून घ्यावा. त्याच तुपात मखाणे अर्धा मिनिट परतून घ्यावेत. मखाणे थोडे आक्रसतील. ते ही डिंकाच्या ताटात काढून घ्यावेत.
आता मंद आचेवर त्याच कढईत खसखस अर्धा मिनिट भाजून घ्यावी. खसखस सुद्धा ताटात काढून घ्यावी.
आता कढईत एक टीस्पून तूप घालून त्यात खजुराचे तुकडे मंद आचेवर मिनिटभर परतून घ्यावेत. परतलेले खजूर ताटात काढून घ्यावे.
कढईत पुन्हा 4 टेबलस्पून तूप घालून ते तापल्यावर त्यात राजगिरा पीठ घालावे. मंद आचेवर पीठ बदामी रंगाचे होईपर्यंत 3-4 मिनिटे खमंग भाजावे. भाजून झाल्यावर ताटात काढून घ्यावे. आता पर्यंत भाजलेले सगळे साहित्य थोडे गार होऊ द्यावे.
आता त्यात बदाम, भाजलेले शेंगदाणे, वेलची पूड, जायफळ पूड आणि गूळ हे सगळे साहित्य घालून नीट एकत्र करावे व हे मिश्रण मिक्सरवर बारिक करून घ्यावे.
कढईत 2 टेबलस्पून तूप घालून त्यात खवा अर्धा मिनिट परतून घ्यावा. आता त्यात मिल्क पावडर घालून ती खाव्यासोबत नीट एकजीव करावी.
एका मोठ्या परातीत किंवा पसरट मोठ्या भांड्यात खवा व मिल्क पावडरीचे मिश्रण राजगिरा पिठाच्या मिक्सरवर बारिक केलेल्या मिश्रणात घालावे. आता त्यात बारिक किसलेलं खोबरं मिसळावं. हे सगळे जिन्नस नीट एकजीव करावे. चांगले मळून घ्यावे.
तयार मिश्रणाचे लाडू वळावेत.
दिलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे 30-32 लाडू तयार होतात.
तळटीप: खवा घालणे ऐच्छिक आहे. खवा घालायचा नसेल तर राजगिरा पिठाचे मिश्रण मिक्सरवर बारीक करून झाल्यावर त्यात मिल्क पावडर मिसळावी. तयार मिश्रण खव्या अभावी कोरडे वाटत असल्यास त्यात थोडे तूप घालून घ्यावे. मग मिश्रण एकजीव करून लाडू वळावेत.
खवा घालून लाडू केल्यास ते एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावेत. 10-15 दिवस चांगले रहातात.
खवा न घालता लाडू केल्यास एअरटाईट डब्यात भरून बाहेरच ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. 8-10 दिवस चांगले राहतात.
© BetterFAST Lifestyle Consultancy, Pune.