मायेचेबोल  भाग 8

BetterFastPregnancyTips

जेवलीस का गं.. जेवण जातंय का नीट..

“भरपूर खा गं.. दोन जीवांची आहेस आता.. दुप्पट खायला हवंस तू..” हा आग्रह तर तुला रोजचाच असेल ना आता 🙂

चटणी, कोशिंबीर/सॅलड, 2 भाज्या, कडधान्यां ची उसळ, 2-4 पोळ्या, वाटीभर वरण, भात, दही, ताक..(बापरे मी लिहून दमले..:-)) कसं शक्य आहे इतकं सगळं एका वेळी खाणं आणि ते पण रोज.. हो ना असंच वाटतंय का तुला पण..

सगळ्या जणी भांबाऊन जातात गं की भरपूर म्हणजे नक्की किती.. पण खरंच तू काळजी करू नकोस. आपण हे जरासं सोप्प करूया.. म्हणजे नुसतंच भरपूर खाण्यावर भर देण्यापेक्षा आपण थोडक्यात पण पोटभरीच आणि पौष्टिक सुद्धा असेल असं काहीतरी बघू..

मी आपल्या ढोबळमानाने वेळा देते पण तुला ती वेळ पाळणं शक्य नसेल तर त्यातल्या त्यात तुझ्या दिवसभराच्या दैनंदिनीत ते कसं बसवायचं ते ठरवून घे. म्हणजे जरा अंदाज घेऊन साधारण आठ्वड्याभरच तुला वेळापत्रक ठरवता येईल.

तर साधारण सकाळी 8 वाजता न्याहारी:

यात तू उपमा, पोहे, रव्याचा शिरा, इडली, उत्तपा, डोसा, थालीपिठ (ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, बेसन, गहू, तांदूळ यातली कोणतीही पिठं एकत्र करून किंवा सातू च्या पिठाचं किंवा भाजणीचं थालीपिठं करू शकतेस), धपाटे, पराठे, ढोकळा, कणकेची उकडपिंडी, नाचणीचा शिरा, नाचणीचे सत्व, कणकेचा शिरा असं काही करून थोडंसं खाऊ शकतेस.

साधारण 12 ते 1 च्या दरम्यान जेवण:

यात तू ज्वारी, बाजरी, नाचणी, ज्वारी+बाजरी अशी एखादी भाकरी खाऊ शकतेस. भाकरी म्हंटल्यावर घाबरून जाऊ नकोस गं. छोटीशीच कर हवं तर फुलक्याच्या आकाराची इटुकली पिटकुली.

भाकरी सोबत एखादी पालेभाजी, फळभाजी किंवा कडधान्याची उसळ असं काही आलटून पालटून खा.

अगदी दोन घास का होईना वरण+भात+तुप+लिंबू किंवा दही+भात किंवा भात+मुगाच्या डाळीची/मसुराच्या डाळीची/सर्व डाळींची एकत्र अशी आमटी+तुप.

थोडंस ताजं गोड दही आणि एक वाटी गोड दह्याचं ताक.

बास.. झालं की दुपारचं जेवण.

जेवताना सॅलड खा थोडंस. काकडी+टोमॅटो+गाजर+बीट+कच्चा कोबी+कच्ची मेथी यातल्या 2 किंवा 3 गोष्टी थोड्या प्रमाणात.

यानंतर 4 वाजता एखादं फळ. जो ऋतु असेल त्याप्रमाणे.

पुन्हा 6 वाजता च्या आसपास काहीतरी हलकं फुलकं:

शेंगदाण्याची चिक्की, राजगिरा चिक्की, खोबऱ्याची चिक्की, गुळपट्टी, गुळ पापडी, राजगिरा लाडू, बेसनाचा लाडू, मुगाच्या डाळीचा लाडू, सुकमेव्याचा लाडू, कणकेचा लाडू, रव्याचा लाडू, खोबऱ्याची वडी, ज्वारीच्या लाह्यांचा किंवा साळीच्या लाह्यांचा डाळं+शेंगदाणे घालून केलेला चिवडा, कुरमुऱ्याच भडंग, भाजलेले चणे-शेंगदाणे+गुळ+खोबरं असं काहीतरी पौष्टिक पण थोडंस खाल्लं तरी पुरेसं असेल असं.

मग साधारण साडे आठ ते नऊ च्या दरम्यान रात्रीचं जेवण:

पोळी किंवा फुलका आणि त्या सोबत एखादी पालेभाजी किंवा फळभाजी.

पुन्हा दोन घास का होईना वरण+भात+तूप+लिंबू.

मग रात्री झोपण्यापूर्वी अगदी थोडं म्हणजे एक लहान कप/अर्धा कप गार दुध. गार म्हणजे थोडा वेळ आधीच फ्रिजमधून काढून ठेवायचं बाहेर आणि शक्यतो साखर वगैरे न घालता नुसतं प्यायचं. छान लागतं.

वर दिल्याप्रमाणे अगदी सगळं दिवभरात खाणं सुरुवातीच्या महिन्यांमध्ये जर शक्य होत नसेल तरी काही काळजी करू नकोस. जसं जमेल, जितकं जमेल तितके प्रयत्न चालू ठेव.

कुणाकुणाला उलट्या होतात किंवा नुसतं उलटी सारखं वाटत राहतं किंवा फोडणीच्या वासाने/अन्नाच्या वासने जेवणावरची वासनाच उडून जाते. पण तरीही या सगळ्या गोंधळात पण काही ना काही थोड्या प्रमाणात तरी खात रहा. जे तुला रुचेल पचेल असं बघ. उपाशी मात्र राहू नकोस हं.

अजून काही वाटलं तर नक्की विचार.

–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in

Share your love