BetterFastPregnancyTips
हुssश्श संपला बाई अजून एक आठवडा..हवाहवासा विकेंड आला.. मग कुठे जायची तयारी करतेय स्वारी.. अहोंसोबत कुठेतरी.. निवांत दोन क्षण..
काय गं काय झालं प्रश्न पडलाय का.. आता काय कपडे घालू??? नक्की काय बरं दिसेल??? उठताना-बसताना-चालताना मला आवरता सावरता येईल असं..अवघडणार नाही असं..
हम्म्म, प्रश्न तर आहे खरा पण तू त्याची खरंच इतकी काळजी करू नकोस. कारण उत्तर अगदी सोप्प आहे..
जे कपडे घालायचे ते तुझ्या आत्ताच्या किंचित अवघडलेल्या स्थितीत तुझ्या साठी एकदम सोयीचे असणं फार आवश्यक आहे. सद्या कुठेही बाहेर जायचं असलं, अगदी लग्नाला सुद्धा, तरी वावरताना तुझी सोय महत्वाची.
तुला जर रोज साडी नेसण्याची सवय असेल आणि बाहेर जाताना पण साडीच नेसायची इच्छा असेल तर:
1 शक्यतो वजनाला हलकी असेल अशी साडी निवडायची.
2 तुला टोचेल बोचेल अशा गोष्टींची नक्षी
नसेल तर उत्तमंच.
3 पदर व्यवस्थित पिनप कर म्हणजे उगच तो सावरण्याचा खटाटोप नाही आणि सारखं पायात येण्याचा पण प्रश्न नाही.
तुला जर पंजाबी ड्रेस, कुडता-पायजमा/लेगिंग्स असे कपडे घालायची सवय असेल तर फारंच छान:
1 तेही वजनाला हलके असतील असेच निवड.
2 तुला टोचेल बोचेल अशा गोष्टींची नक्षी
शक्यतो याच्यावर पण नसलेलीच बरी.
3 मोकळे ढाकळे, उठता बसताना सहज ताणले जातील असं बघ.
4 ओढणी, स्टोल असं काही घ्यायचं झालं तर तेही हलकं फुलकं, सांभाळायला सोप्प, न रुतणारं असं घे.
तर हलके फुलके, मऊसूत, सैलसर, शक्यतो सुती किंवा चांगल्या दर्जाचे होजीअरी कपडे वापर.
जीन्स, ट्राऊजर्स असे कपडे सध्या नको ग घालुस. असतील तर सांभाळून ठेऊन दे. नंतर वापर ना बिनधास्त.
मानेपासून पोटरी पर्यंत कुठेही अंगाला घट्ट बसणारे कपडे घालणं टाळंच जरा. कारण रक्ताभिसारण नीट व्हायला हवं. आणि कधी कधी जरा धाप लागू शकते, श्वास घ्यायला जड वाटू शकतं तेव्हा घट्ट कपड्यात अजून त्रास होईल गं तुला.
आणि हो, सध्या तुला घरात साडी नेसणं शक्य असेल तर सुती साड्या नेस. निदान आठवड्यातून 2-3 दिवस तरी. ज्या बाळंतपणापर्यंत वापरून वापरून छान मऊ होतील. म्हणजे मग बाळाला गुंडाळायला वापरता येतील. परत त्यात तुझा वास असेल त्यामुळे त्यात गुंडाळल्यावर बाळलाही छान वाटेल. आपल्या आईचा वास ओळखतात बरं बाळं.
अजून एक महत्त्वाचं म्हणजे उंच टाचेच्या चप्पल, सँडल अजिबात घालायच्या नाहीत हं. या दिवसात तुझ्या पोटाचा आकार जसा वाढत जाणार आहे ना तसतसा तुझ्या पाठीचा कणा, कंबरेतली हाडं, स्नायु यांच्या ठेवणीत पण अनेक बदल घडत जातील. त्यामुळे या सगळ्या शारीरिक बदलांसह वावरताना साध्या, मऊ चप्पल/सँडल वापरणं केव्हाही सोईसकरच ठरेल. घरात वावरताना पण पायात सतत स्लीपर घालत जा. फार वेळ खुर्चीत, सोफ्यावर, कार मध्ये वगैरे बसल्याने, बराच वेळ उभं राहिल्याने,जास्त चालल्याने पायावर थोडीशी सुज येऊ शकते. त्यामुळे बंद शुज वगैरे प्रकारातल्या गोष्टी तुला त्रासदायक ठरू शकतात. म्हणून नीट काळजीपूर्वक विचार करून आण हं चप्पल/सँडल.
बाकी अजून काही मनात असलं तर तेही बिनधास्त विचार.
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in