मायेचेबोल  भाग 16

BetterFastPregnancyTips

आज तुझी फार आठवण येत होती.. अगदी प्रत्येक घासाला. .

त्याचं काय झालं, मी आज मस्त सुरणाचे काप केले होते.. त्याच्या खमंग वासाने घर भरलं होतं..

आता तुझ्या तोंडी हे चविष्ट काप पडल्याशिवाय मला काही चैन पडायचं नाही गं..

तर मी काय म्हणते, पाव किलो सुरण आणंच तू आपली..

तो सुरण चांगला स्वच्छ धुवून घे, सगळी माती नीट चोळून काढून टाक. नंतर दोन्ही हाताला मागून पुढून अगदी मनगटापर्यंत खायचं तेल व्यवस्थित लावून घे. (आता हाताला वगैरे तेल कशाला लावायला हवं.. असं म्हणून डोळे मोठे करून पाहू नकोस.. सांगते तसं कर फक्त.☺)

सुरणाचा पदार्थ करायचा तर थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात हे खरंय गं.. पण ते आहे ही तितकंच चविष्ट, आरोग्यासाठी उत्तम आणि सगळ्यांसाठीच पौष्टिक. गंमत म्हणजे काप तोंडात टाकला रे टाकला की सगळ्या मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान मिळतं.. 😉😉

अगं सुरण हे कंद खुप खाजरं असतं. त्यामुळे ते चिरताना त्याचा रस हाताला लागला तर हात खुप खाजवत रहातात बराच वेळ.. म्हणून तेल लावायचं. आणि सुरणाच्या प्रत्येक पदार्थात भरपूर चिंच किंवा आमसूल घालायलाच हवं.. नाहीतर घसा खवखवतो..

हां तर कुठे होतो आपण…

हं आता हाताला तेल लावून झाल्यावर त्या सुरणाचे दोन पेर लांब आणि भाकरी पेक्षा थोडे जाड असे तुकडे करून घे. तुकडे करतानाच लगेच ते पाण्यात टाकत रहायचे. नाहीतर ते काळे पडायला लागतात. आता सगळे तुकडे कुकर च्या एका डब्यात ठेवून कुकरला उकडायला लावायचे. तीन-चार शिट्या पुरतात सुरण नीट शिजायला.

सुरण शिजत असतानाच एकीकडे दोन मोठ्या लिंबा च्या आकारा एवढी चिंच भिजत घाल. चांगला एक टेबलस्पून घट्ट चिंचेचा कोळ तयार व्हायला हवा बरं का..

कुकर चा गॅस बंद केला की लगेच एका पसरट भांड्यात साधारण वाटीभर बेसन, अर्धा टेबलस्पून रवा, किंचित हळद + हिंग + लाल तिखट + चवीपुरतं मीठ, चिंचेचा कोळ आणि गरजे पुरत पाणी असं सगळं नीट एकत्र करून घे. आपण अळूच्या वडी साठी किंवा बटाट्याच्या भजी साठी जसं सैलसर पीठ भिजवतो ना तसंच भिजवं. मग त्यात सुरणाचे तुकडे नीट घोळवं. सगळ्या तुकड्यांना नीट सगळीकडे लागायला हवं हे मिश्रण.

आता हे सुरणाचे काप असेच नीट झाकून ठेवून द्यायचे निदान अर्धा तासासाठी. चिंचेची चव कशी त्या तुकड्यात छाssन मुरायला हवी.

अर्ध्या तासानंतर तवा गरम करायला ठेव.. त्याला सगळीकडे तेल लावून घे.. तेल तापलं की एक एक तुकडा तव्यावर ठेवायला सुरुवात कर. तुकडे एकमेकांना चिकटून रचलेस तरी चालतील. ते साधरण थालीपिठासारखं दिसलं आणि चिकटून एकत्र झालं तरी चालेल.. आता बाजू बाजुनी अजून थोडंसं तेल सोड.. मध्यम आचेवर राहू दे गॅस.. थोड्यावेळाने उलथून घे आणि दुसरी बाजू पण किंचित तेलावर खरपूस भाजून घे.. तुकडे चिकटले असतील तर तव्यावरून उतरवल्यावर त्याचे पुन्हा तुकडे पाड कालथ्यानी. आता पर्यंत त्याचा मस्त खमंग वास यायला लागेल.. 😉😉

जमतं की नाही म्हणता म्हणता झाले की तुझे सुरणाचे काप तयार..👍👍

पाव किलो सुरणात असे दोन घाणे तरी होतील..

दोन माणसांसाठी भरपूर होतं ते..

खुप पौष्टिक असतं बरं सुरण. नेहमी खात जा. जमलं तर अजून काही रेसिपी पण देईन तुला सुरणाच्या. तू खाल्लंस तर मला आनंद आहे..

☺☺

–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in

Share your love