BetterFastPregnancyTips
तुला एक गंमत सांगु.. आत्ता या घडीला तुझ्यात दोन हृदयांची स्पंदनं सुरु आहेत.. 😊 कदाचित तुझ्या मनात आलं ही असेल हे पण तरीही मला आपलं वाटलं तुला सांगावं.. म्हंटलं तेव्हढीच तु अजून खुश होशील.. मी तुला असं म्हणाल्यावर खुद्कन हसशील, गोड लाजशील..😊 मला आपली तुला खुश असलेलं पहायची हौस गं.. पोटुशी ना तु.
अगदी तुझ्या सारखाच एक जीव, तुझ्या पोटात वाढवण्याची आणि त्याला सुखरूप या जगात आणण्याची केव्हढी मोठ्ठी जबाबदारी सृष्टीने तुला दिली आहे. आपल्या सगळ्यांचाच लेकरू म्हणून सांभाळ करणारी ही सृष्टीच, नवनिर्मितीच्या जबाबदारी सोबत ती पेलण्याची शारीरिक आणि मानसिक ताकदही तुला सढळ हस्ते देत आलीये. आणि याची सुरुवात तिनं तेव्हांच केलीये जेव्हा तु पहिल्यांदा ऋतुमती झालीस..
हो अगदी तेव्हाच जेव्हा तुला समजतही नव्हतं की तुझ्या सोबत हे काय होतंय, का होतंय..शाळकरी वयात या कशाचीच जाणीव नसलेली, भांबावलेली, घाबरलेली, रडवेली झालेली तु..तेव्हा पासून आत्ता पर्यंत दर महिन्याला येणाऱ्या त्या चार दिवसांनी चिडचिडणारी तु..
गरोदरपण आणि बाळंतपण एव्हढंच कधीचं नसतं गं ते.. इतक्या वर्षात दर महिन्याला चार दिवस, अगदी न चुकता, काय कमी सहन केलंस का तु..त्या वेदना, ते अवघडलेपण, तो मानसिक ताण, क्वचित कधी तरी कपडे खराब झाले म्हणून ओशाळून टाकणारी ती परिस्थिती, कधी ऐन सहलीच्या वेळी गडबड तर कधी सण समारंभाच्या वेळी एव्हढंस तोंड करून हिरमुसलेली तु..या सगळ्यातून तावून सुलाखून निघून जणू एक तपंच केलं आहेस ज्याचं फळं आज तुझ्या ओटीत आहे, तुझ्या कुशीत दिसामासाने वाढतं आहे..
असं हे स्त्रीत्वाचं दान जे सृष्टीनी तुला दिलंय त्याला आजवर कदाचित अनेक वेळा तु कोसलं ही असशील, कंटाळली ही असशील, किती हा सगळा त्रास सोसावा लागतोय.. यात तुझी एकटीची काहीच चुक नाही गं..स्त्रीयांनाच आदर नाही स्त्रीत्वाचा.. तु लहानाची मोठी होताना नेहमी हेच ऐकलं असशील तुझ्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीच्या तोंडून.. काय बाई हा नुसता छळवाद..दर महिन्याला आपली बायकांच्याच वाट्याला येते ही ब्याद..अडचण .. प्रॉब्लेम .. विटाळ .. वगैरे वगैरे.. हे सगळं ऐकून अजाणतेपणी तुझ्या मनावर पण तेच कोरलं गेलं आणि ते अजून अजून खोल रुतंत गेलंय..
पण खरंच विचार कर, ज्यातुन एक नवीन जीव जन्माला येतो, स्त्रीला मातृत्व लाभतं जे तिच्या शारीरिक आणि मानसिक स्वाथ्यासाठी फार आवश्यक असतं, अशी ती गोष्ट वाईट कशी असेल, अमंगळ कशी असेल..
म्हणूनच सृष्टीच्या या तुला मिळालेल्या वरदानचा आनंदाने स्वीकार कर. ज्या क्षणी गरोदर राहिलीस त्याचक्षणी सुरु झालेलं तुझं हे मातृत्व मनमुराद जग.. येणाऱ्या बाळालाही, मग ते मुलगी असो की मुलगा, या वरदानाचा .. स्त्रीत्वाचा आदर करायला शिकव.. 😃
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in