लहान मुलं आणि खाऊ

आजकाल लहान मुलांबद्दल प्रेम जिव्हाळा व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धती बदलल्या आहेत. आपल्याला त्यांचे लाड कराचे आहेत तर आपण त्यांच्याशी खेळू शकतो, त्यांना गाणी गोष्टी सांगू शकतो, त्यांना फिरायला घेऊन जाऊ शकतो. पण प्रत्येक वेळी खाऊ चॉकलेट आईस्क्रीम दिलेच पाहिजे असे जरुरी नाहीये. आपण त्यांना जशा सवयी लावणार तशाच त्या लागणार आहेत. BetterFast मध्ये नेहमीच अनेक पालक लहान मुलांना खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी, त्यांचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारकशक्ती चांगली रहावी यासाठी चौकशी करत असतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक रेसिपीजची मागणी तर रोजच होत असते. ह्या सगळ्या बद्दल नक्कीच मार्गदर्शन करतो आम्ही. पण खरी समस्या तर मोठ्या माणसांची आहे जी असे अनावश्यक लाड पुरवतात.

याविषयावरचा हा सविस्तर लेख:

लहान मुलं आणि खाऊ

साधारण सतरा-अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी जिथे काम करत होते तिथली माझी एक कलीग तिच्या 5-6 वर्षाच्या मुलीला एक दिवस ऑफिस मध्ये सोबत घेऊन आली होती. येतानाच तिच्या हातात पेप्पी नामक पॅकेज्ड फास्ट फूडची 5-6 पाकिटं आणि काही चॉकलेट्स होती. ऑफिस मधले इतर सगळे तिच्याशी गप्पा मारत होते. “अरे वाह! आम्हाला पण देशील का तुझा खाऊ ?” अशा स्वरूपाच्या लाडिक गप्पा सुरु होत्या.

माझ्या अगदी जवळच्या ओळखीतल्या दोन लहान मुली पण हे असले पदार्थ आणि चॉकलेट्स जवळजवळ रोजच खायच्या. त्यांना काही बोलणं शक्य नव्हतं आणि त्यांच्या आईला त्याबद्दल विचारणं तर अजूनच कठीण होत. पण माझी ही कलीग स्वतः डॉक्टर होती. त्यामुळे तिच्याकडून मला माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा होती.

मी तिला विचारलं ” इतकी सगळी पॅकेट्स आणि चॉकलेट्स?? आज काही स्पेशल कारण आहे का??”

ती म्हणाली ” नाही, सहज घेतलं. येताना रस्त्यात दुकान दिसलं. ही मागे लागली म्हणून घेतलं.”

परत माझा प्रश्न ” तू नेहमी घेऊन देतेस का तिला?”

ती ” हो, अगं. असं काय विचारतेस. द्यावंच लागतं घेऊन.”

मी ” द्यावंच लागतं म्हणजे?”

ती ” अगं हे दिसलं की मुलं हट्ट करतातच. मग काय करणार…”

मी ” अगं पण म्हणून नेहमी द्यायचं घेऊन आणि ते पण एवढं सगळं… म्हणजे हे काही मुलांच्या वाढीसाठी पोषक सकस वगैरे नाहीये ना … म्हणून मला प्रश्न पडला आहे की तू हे नेहमी कसं देतेस तिला … “

ती “अगं, टीव्ही वर पाहून पाहून ह्या सगळ्या गोष्टींचा इतका मारा होत असतो मुलांच्या मनावर आणि दुकानात गेलं की समोरच हे सगळं मांडून ठेवलेलं असतं. मग मुलं हट्ट करतातच. मग काही पर्याय नसतो.”

मी ” हो ते ठीक आहे गं. ते समजू शकते. टीव्ही वरच्या जाहिराती किंवा दुकानात मांडलेल्या वस्तू यावर आपला काही कंट्रोल नाही. पण कधीतरी खाऊ घेऊन देणं वेगळं आणि हे असं नेहमी घेऊन देणं बरं नाही ना… म्हणजे सगळ्याच दृष्टीने.”

आता तिला माझा राग यायला लागला होता कारण तिच्या दृष्टीने मी तिला, एका डॉक्टरला, उपदेशाचे डोस पाजत होते.

ती रागावून “तुला मुलं झाली ना की कळेल तुला. तेव्हा येईन मी तुला हेच प्रश्न विचारायला. मग बघू तेव्हा तू काय करतेस… “

त्यावेळी ती खूप चिडलेली म्हणून प्रत्यक्षात मी काहीच बोलले नाही. पण माझ्या मनातून ते काही जाईना. आपल्याला मुलं झाली की आपण पण असंच करू का… की आपण त्यांचे हे अति फाजील लाड पुरवणार नाही… आपली मुलं पण हट्ट करतील, दुकानात रडून गोंधळ घालतील तेव्हा आपण पण नाईलाजाने हे सगळं असं विकत घेऊ का…

तेव्हा एक मन तर म्हणत होतं की “नाही, आपण असं करणार नाही. रडली तर रडू देत. त्यात काय. लहान मुलचं ती. हट्टीपणा करणारच. कशाला प्रत्येक वेळी त्यांच्या हट्टापुढे झुकायचं.” दुसरं मन म्हणायचं ” आजूबाजूला इतक्या माता आहेत ज्या सर्रास आपल्या मुलांना हे सगळं घेऊन देतात. त्यांचं मुलांपुढे काही चालत नाही आणि आपल्याला हे टाळायला जमेल का???” www.betterfast.in

आज इतक्या वर्षांनंतर हे सगळं आठवण्याचं एक कारण असं की अनेक पालक BetterFast मध्ये चौकशी करत असतात की मुलांना नक्की काय खायला प्यायला द्यावं? त्यांच्या योग्य वाढीसाठी काय चांगलं आहे? लहान मुलांमध्ये अगदी पाच सहा वर्ष वयापासूनच जाणवणारी अतिरिक्त वजनाची समस्या हा तर आजकालच्या अनेक पालकांचा चिंतेचा विषय आहे.

टीव्हीवरच्या जाहिराती, दुकानांच्या दर्शनी भागात मांडलेल्या वस्तू आणि मॉल संस्कृतीमुळे आजकाल मुलांच्याच काय तर पालकांच्याही मनावर अनेक मार्केटिंग गिमिक्स ची इतकी जादू असते की त्यांना या मोहजालातून बाहेर काढणं हे पहिलं मोठं काम असतं. त्यानंतर आहारविहार जीवनशैली बद्दल मार्गदर्शन. www.betterfast.in

आज मलाही वाढत्या वयातली दोन मुलं आहेत. ती पण हट्ट करतात. त्यांना ही या सगळ्या आकर्षक गोष्टी हव्या असतात. जे अगदी सहज आहे. हे होणारच हे आधीच मान्य केलेलं आहे. त्यामुळे असे प्रसंग हाताळणं कधी कधी थोडं कठीण वाटत असलं तरी अशक्य होत नाहीये. काय द्यायचं, किती द्यायचं आणि कधी द्यायचं ह्याची सूत्र पालक म्हणून आपल्याच हातात ठेवणं हे अजून तरी साधलं आहे. इथून पुढेही नीट जमावं एवढीच इच्छा आहे.

ह्या लेखन प्रपंच्याचं दुसरं कारण:

काल नेहमीप्रमाणे मी आमच्या भागातल्या किराणा दुकानात गेले होते. तिथे नेहमीच खाऊ, चॉकलेट्स घेण्यासाठी लहान मुलं, त्यांचे मम्मी पप्पा, आजी आजोबा असे दिवसातल्या कोणत्याही वेळी कोणी ना कोणी हजर असतात. “काय घ्यायचं तुला. जा आत जाऊन घेऊन ये. त्या आंटी ला सांग तुला काय हवंय.” असे प्रेमळ संवाद नेहमीच कानी पडतात. त्या दुकानदार ताई सुद्धा खूप हसतमुख आहेत. सगळ्यांशी प्रेमाने बोलून काय हवं नको ते देत असतात.

पण काल जरा एक विचित्र घटना घडली.

एक 5-6 वर्षांचा मुलगा दुकानात आलेला आणि त्याच्या सोबत असलेल्या बाईकडे तो हट्ट करत होता काहीतरी खाऊ घेऊन दे म्हणून. ह्यात विचित्र काहीच नाही म्हणा. हे असे प्रसंग नेहमीचेच. विचित्र त्यापुढे घडलं.

दुकानदार ताई त्या बाईंना म्हणत होत्या की “तुम्ही त्याला खाऊ घेऊन देऊ नका. अशाने त्याला सवय लागेल. त्याला वाईट सवय लावू नका.” पण ती बाई म्हणाली “जाऊ द्या हो. लहान आहे. तो हट्ट नाही करणार तर कोण करणार. तसंही लहान मुलं ही देवाचं रूप असतात. त्याला देतेय तर देवालाच दिल्या सारखं आहे. आज मी त्याला दिलं तर उद्या देव मला पण काहीतरी चांगलं देईल. रोज त्याला दिलं तर वर गेल्यावर हे पुण्य मला उपयोगी पडेल.”

पहिला धक्का मला तेव्हा बसला जेव्हा एक पटाईत दुकानदार व्यक्ती “खाऊ विकत घेऊ नका” असा सल्ला देत होती. दुसरा धक्का बसला त्या बाईचं लॉजिक ऐकून. हा प्रसंग पार पडला. ती बाई निघून गेली. माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून दुकानदार ताई मला सगळी घटना नीट समजावून सांगू लागल्या.

जवळच्याच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या त्या छोट्या मुलाला पूर्वी त्याच्या बिल्डिंगमधली लोकं दुकानात येताना सहज सोबत घेऊन यायची आणि सोबत आणलाय म्हणून काहीतरी खाऊ चॉकलेट घेऊन द्यायची. आता तो मुलगा कोणी इकडे येत असलं तर स्वतःहून त्यांच्या मागे लागून इकडे येतो. इथे दुकानात येऊन हक्काने हट्टाने त्यांच्याकडून काहीतरी मागून घेतो. 5-10 रुपयांची वस्तू घेऊन द्यायला लोकांना काहीच वाटत नाही. तासाभरात कधी कधी तो 3-4 लोकांसोबत येऊन गेलेला असतो आणि प्रत्येक वेळी नवीन खाऊ घेऊन गेलेला असतो.

ती दुकानदार ताई तशी खूप चांगली आहे. तिने त्याच्या आईला हे सगळं सांगितलं. त्याची आई त्याला ओरडली याबद्दल. तर त्यावर तो मुलगा आता इतका निगरगट्ट झालाय की तिला म्हणतो “मी तिथेच खाऊ खाऊन घेईन. तुला दिसणारच नाही. तू थोडीच माझ्या पोटात पाहू शकणार आहेस. तुला कळणारच नाही. “

हे सगळं रामायण ऐकल्यावर मला कळलं की तो मुलगा इतक्या घाईने त्या बाईने, जी त्याच्या बिल्डिंग मधली त्याची एक शेजारीण आहे, घेऊन दिलेला खाऊ तिच्याच मागे लपून का खात होता ते.

आता ही दुकानदार ताई एव्हढं समजावून सांगत होती तरी त्या बाईने ऐकलं नाही. इतर लोकही ऐकत नाही. आणि होऊन होऊन काय होईल … हिने नाहीच दिलं तर बाजूच्या दुसऱ्या दुकानातून घेऊन देतील. पण हे प्रकार थांबणार नाहीत. www.betterfast.in

असाच अजून एक प्रसंग:

मुलांना शाळेत घ्यायला येणाऱ्या काही मातांचा ग्रुप नेहमीच शाळेजवळ गप्पा मारत उभा असतो. त्यातली एक पालक माता जी आठवड्याच्या 5 पैकी किमान 2-3 दिवस स्वतः तिच्या पाल्याला नेण्यासाठी येते. ती आली की नेहमीच जवळच्या दुकानातून खूप चॉकलेट्स घेते आणि जवळ उभ्या असलेल्या सगळ्या मुलांना वाटते. उगाचच, काहीही कारण नसतं रोज चॉकलेट्स वाटण्यासाठी. तिला अनेकदा “नको देउ नेहमी” असं सांगूनही ती ऐकत नाही. “इतकी गोड मुलं आहेत ही सगळी. ह्यांच्याकडे पाहिल्यावर मी स्वतःला थांबवूच नाही शकत गं.” हे तिचं उत्तर असतं नेहमी. काही मुलं शाळेतून बाहेर पडली की पहिले ही “लाडकी मावशी” आली आहे का आज ते शोधतात. त्यातल्या एका मुलाला साखर आणि साखरेच्या पदार्थांची ऍलर्जी आहे. असे पदार्थ खाल्ले तर तो लगेच आजारी पडतो. त्याच्या आईनेही अनेकदा चॉकलेट्स न वाटण्याबद्दल तिला गोडीत सांगायचा प्रयत्न केला. पण उपयोग शून्य.

अशी लोकं पाहिली की समजत की मुळात मोठ्या माणसांच कौन्सिलिंग करण्याची किती गरज आहे. www.betterfast.in

दोन दिवसांपूर्वी असाच अजून एक प्रसंग घडला.

गप्पांच्या ओघात कॅब ड्राइव्हर सांगत होता. त्याची लहान पुतणी आहे. बिल्डिंग मधलं कोणीही येता जाता तिला उचलून घेऊन जातो आणि दुकानातुन खाऊ चॉकलेट घेऊन देतं. बिल्डिंगमधले सगळे तिचे असे खूप लाड करतात. त्यामुळे तिला पण आता यासगळ्या गोष्टींची खूप सवय लागली आहे.

हे सगळे प्रसंग पुरेसे बोलके आहेत. आजकाल लहान मुलांबद्दल प्रेम जिव्हाळा व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धती बदलल्या आहेत. आपल्याला त्यांचे लाड कराचे आहेत तर आपण त्यांच्याशी खेळू शकतो, त्यांना गाणी गोष्टी सांगू शकतो, त्यांना फिरायला घेऊन जाऊ शकतो. पण प्रत्येक वेळी खाऊ चॉकलेट आईस्क्रीम दिलेच पाहिजे असे जरुरी नाहीये. आपण त्यांना जशा सवयी लावणार तशाच त्या लागणार आहेत. BetterFast मध्ये नेहमीच अनेक पालक लहान मुलांना खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी, त्यांचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारकशक्ती चांगली रहावी यासाठी चौकशी करत असतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक रेसिपीजची मागणी तर रोजच होत असते. ह्या सगळ्या बद्दल नक्कीच मार्गदर्शन करतो आम्ही. पण खरी समस्या तर मोठ्या माणसांची आहे जी असे अनावश्यक लाड पुरवतात.

आपण स्वतः आपल्या मुलांना वारंवार अशा गोष्टी देऊ नयेत तसेच इतर कोणी नेहमी देत असेल तर तिथेही ठामपणे नकार द्यावा. शेवटी आपल्या मुलांची शारीरिक मानसिक काळजी, त्यांची योग्य जडणघडण, त्यांची सुरक्षितता हे सगळं आपल्यालाच पहायचे आहे. यात कुठे काही कमी जास्त झाले तर पालक म्हणून सर्वस्वी आपणच जबाबदार असणार आहोत. www.betterfast.in

—- तनुजा जोशी

© BetterFAST Lifestyle Consultancy, PUNE.

(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action) www.betterfast.in

Share your love