लग्न होईपर्यंत अगदी सुरळीत वेळच्यावेळी येणारी पाळी लग्नानंतर अचानक विस्कळीत होते. कोणाची दोन-अडीच महिने येतंच नाही तर कोणाला आठ-पंधरा दिवसांत पुन्हा भयंकर ब्लिडींग सुरू होते. गोळ्या घेऊनही आठ ते पंधरा-सोळा दिवस ब्लिडींग थांबत नाही. अशक्तपणा, चिडचिड, अंग दुखणे, शक्तिपात झाल्या सारखे वाटणे, सतत अनेक दिवस होणाऱ्या ब्लिडिंगमुळे सततचा ओलावा सहन करणे, रात्री शांतपणे झोप न होणे, अचानक खूप वजन वाढणे… त्रासांची यादी लांबलचक आहे.
नवीन लग्न होऊन नव्या घरी, नवी नाती, नव्या माणसांमध्ये आलेली “ती” या सगळ्याने भांबावून न जाईल तर नवल. हे सगळं असं अचानक का सुरू झालं आपल्यासोबत हे तिला कळत नसतं. या सगळ्यात नव्या जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी ओढाताण, नवऱ्या सोबत नव्या नवलाईचं नातं जपायला फुलवायला ही पुरेसा वेळ न मिळणं किंवा तशी परिस्थिती नसणं, निर्माण झालेली “ही” नवीन समस्या नवऱ्याला सांगताना होणारी कुचंबणा, त्यात भर म्हणून “हिची तब्येत तर फारच नाजूक दिसते आहे” किंवा “फारंच नाटकं बाई आजकालच्या मुलींची, आम्ही नाही का सगळं निभावून नेलं” हे असले टोमणे ऐकावे लागणं… ही काही फक्त गाव खेड्यातली परिस्थिती नाही तर हे cosmopolitan म्हणून मिरवणाऱ्या मोठ्या शहरातल्या तथाकथित सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबांमधली सुद्धा कहाणी आहे. घरोघरी मातीच्या चुली. BetterFast Lifestyle
नर्सरीतून एखादं रोपटं आणलं तरी सुरुवातीचे काही दिवस त्याची जरा जास्त काळजी घ्यावी लागते. कारण त्याचं हवा-पाणी बदलेलं असतं. आणल्या आणल्या लगेच त्याची माती काढून त्याला दुसऱ्या मातीत लावता येत नाही. अशाने ते रोपटं दगावण्याची जास्त शक्यता असते.
इथे एक चालता बोलता जीव आपलं गणगोत सोडून येतो तर त्याला किती जपायला हवं…
उलट तिच्यावर जबरदस्ती केली जाते अनेक गोष्टींची. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे गोळ्या खाऊन पाळी पुढे मागे करायला लावणे. “पाळी पुढे ढकलायला ह्या गोळ्या घे. देवकार्याचं सगळं सुरळीत पार पडलं पाहिजे. आमच्याकडे सगळं पाळावं लागतं.” असं सांगत घरातील जबाबदार (?) स्त्री तिच्या हातात गोळ्या टेकवते. तिला यातलं काही कळत नसतं/माहित नसतं. याबद्दल नवऱ्याशी चर्चा करण्या इतपत नात्यात मोकळेपणा अजून आलेला असतो किंवा नसतो. नवऱ्याला सांगितलं तरी त्याला यातलं काही माहित नसल्याने/समजत नसल्याने/काय करावं कळत नसल्याने “आई सांगेल तसं कर. आई बरोबरच सांगेल.” या स्वरूपाचं उत्तर मिळण्याची शक्यताच जास्त असते. BetterFast Lifestyle
गोळ्या खाऊन नवीन घरच्यांच्या शब्दाचा ती मान ठेवते आपल्या पाळीच्या नैसर्गिक चक्रात ढवळाढवळ होऊ देते आणि नंतर सगळ्या त्रासांना एकटी तोंड देत रहाते, तिची यात काहीच चूक नसते तरीही.
हे “गोळ्या घेणं” प्रकरण वारंवार घडत रहातं कारण वर्षभर काही न काही “पहिले वहिले सण” असतात, देवकार्य असतात, कुळधर्म कुळाचार असतात.
मग घरच्यांना घरात “नवीन पाहुणा” हवा असतो. तेव्हा तिच्या नैसर्गिक पाळीचा जो गोंधळ होऊन बसलाय तो कळीचा मुद्दा ठरू लागतो. हॉर्मोनल इम्बलेन्स, वाढलेले वजन अशा गोष्टी तिच्या आटोक्या बाहेर गेलेल्या असतात. मग पुन्हा हा गुंता सोडवण्यासाठी औषधोपचार, मानसिक ताण. BetterFast Lifestyle
कुठून सुरू झालेली गोष्ट कुठे येऊन पोहोचते. तिथून पुढे पण अनेक वळणं, खाचखळगे पार करता करता ती बेजार होऊन जाते.
अशी “ती” वेगवेगळ्या समस्या घेऊन, वेगवेगळी नावं घेऊन अनेकदा भेटली आहे. रोज भेटते आहे. जेव्हा जेव्हा नवीन “ती” क्लाएंट म्हणून पुढ्यात येते तेव्हा तेव्हा प्रत्येकीबद्दल तितकंच वाईट वाटतं, काळजी वाटते. तिला समजून न घेणाऱ्या, तिला जबरदस्ती या सगळ्यामध्ये ढकलणाऱ्या माणसांचा, परिस्थितीचा खूप राग येतो. हतबल आणि हताश वाटतं.
पण तरीही मार्गदर्शन घ्यायला आलेली प्रत्येक “ती” योग्य सल्ला घेऊन या सगळ्यातून कशी बाहेर पडेल, आपण “तिला” होईल तितकी मदत कशी करू शकू यासाठी जिद्दीने प्रयत्न केले जातात. “तिच्या” आयुष्यात होत जाणारे छोटे छोटे पॉझिटिव्ह बदल तिच्यासोबतच आम्हाला ही आनंद आणि समाधान देऊन जातात.
“It’s my life, it’s my body. I have every right to take decision about my health.
I have every right to deny anything that is creating health issues or psychological issues for me.”
If a woman can understand and say these things confidently then that would be really a great empowerment.
© BetterFAST Lifestyle