उद्याच्या दिवसासाठी ह्या काही गोष्टी

1 जानेवारी 20xx, (xx च्या जागी कोणतंही वर्ष घाला) यावर्षीचा संकल्प, मी वजन कमी करणार!

भरपूर सॅलड खाणार, उकडलेल्या भाज्या खाणार, फक्त फळांचा रस पिणार, एकदम स्ट्रीक्ट डाएट follow करणार, रोज नियमित दोन तास जिम मध्ये घाम गाळणार, रोज पाच किलोमीटर चालायला जाणार, चांगली पाच आकडी रक्कम मोजून औषधं आणली आहेत ती घेणार, advance technology असलेला बेल्ट आणि मशीन घेतलंय ते वापरणार. मी हे पण करणार आणि ते पण करणार. आकाश पाताळ एक करणार. बास ठरलं म्हणजे ठरलं, यावर्षी वजन कमी करणार म्हणजे करणारंच.

1 फेब्रुवारी 20xx, छ्ये हे सगळं बकवास आहे. हे असलं काही करून वजन कमी होत असतं का कधी… आणि मुळात कशाला करायचं ते. चांगला खात्यापित्या घरातला दिसतो. काय वाईट आहे त्यात. चार दिन की जिंदगी. माणसानी कसं दणदणीत खावं प्यावं पचवावं, मजा करावी, मस्त ताणून द्यावी, आराम करावा. डोक्याला आधीच काय कमी ताप आहेत. किती धावपळ दगदग करावी लागते. मरमर काम करावं लागतं. त्यात अजून कुठे मन मारून जगायचं. मनाविरुद्ध बंधनात जगायला करायची का एवढी उरस्फोड.

दोन चार महिने असेच सहज जातात. अर्ध वर्ष संपलेलं असतं. वजन कमी करण्याचे प्रयत्न सोडल्याची खंत आता पार बोथट झालेली असते. औषधं, मशीन्स, डंबेल्स, स्पेशल स्पोर्टशूज, ट्रॅकसूट, वेट लॉसची आणि लो-कॅलरी फूड रेसिपीज्ची पुस्तकं असं सगळं अडगळीत गेलेलं असतं. मोबाईल वरची फिटनेस अँप्स, कॅलरी काउंटर्स, हेल्थ टिप्स च्या वेबसाईट्स सगळं सगळं delete झालेलं असतं.

अशाच वर्षाच्या मध्यंतरात कधीतरी, जिगरी दोस्तांच्या ग्रुप मधल्या एकाला पस्तिशीतच डायबेटीसनं तर दुसऱ्याला बीपी नी गाठल्याचं समजत. असाच एक उमदा तरुण चुलत मित्र, नुकतीच पस्तिशी ओलांडलेला, अचानक डिप्रेशन मध्ये गेल्याचं कळतं. जवळचा नातेवाईक, ज्याचा आत्ताच कुठे संसार लागी लागत होता, तो अचानक हार्ट अटॅक नी कोसळल्याची बातमी येते. आपल्या पिढीतला एक एक गडी असा गारद होताना दिसत असतो.

मग आपलंही धाबं दणाणतं. आपल्याला पण दोन जिने चढले की आता दम लागतो हे जाणवायला लागतं. रात्री बारा, एक वाजून जातो तरी झोप लागत नाही. सकाळी झोप पूर्ण झाली नाही म्हणून दिवस उगवतो तोच आळसावलेला. आवरायचा, कामाला लागायचा उत्साह तर नसतोच पण तरीही पाय ओढत सगळं रेटून न्यावचं लागतं. कामात लक्ष लागत नाही. प्रोडक्टिव्हिटी घसरलेली असते. टार्गेटस् तर दृष्टिपथात पण येत नाहीत. बॉस ची बोलणी खाऊन दिवस सम्पत असतो. घरी येऊन प्रत्येकावर चिडचिड करण्यात आला दिवस ढकलत असतो. फार कंटाळवाणं वाटायला लागतं सगळं. आयुष्यातला चार्म हरवल्या सारखा वाटतो. जगणं ही भयंकर शिक्षा वाटु लागते. पण जगावे लागते. ह्यातून सुटण्यासाठी मग सहज होणारी छोटीमोठी व्यसनं धरली जातात. अगदी थेट बेवड्यासारखी दारु पिणे म्हणजेच व्यसन नाही. सारखा मोबाईल चेक करणे, व्हॉट्सप करणे, फेसबुक वापरणे इथपासून ते सतत काहीतरी खात राहणे इथवर ही व्यसनं पोचतात. ती तुमच्या त्रासलेल्या जगण्यातून क्षणभराचा ब्रेक देत असल्याची भावना निर्माण करतात. पण ही भावनाच मुदलात आपली दुष्मन आहे हे आपल्या गावीही नसतं.

यावर उपाय काय??? ही रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणायची कशी???

सोप्पय अगदी… ‘पहाटे उठा, पळायला जा, जिमला जा, योगा करा, मेडिटेशन करा, सकस आहार घ्या, औषधं घ्या, हे प्रॉडक्ट आणा, ते मशीन वापरा’ असलं काहीही सांगणार नाहीये. आपल्याला पुन्हा त्याच दुष्ट चक्रात अडकायचं नाहीये. So just relax. Take a deep breath once. आणि आता अगदी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या फक्त उद्याचा दिवस… हो खरंंच फक्त उद्याचा दिवस…येणारे 24 तास.

पण असं का हा प्रश्न आलाच असेल ना तुमच्या मनात?

आता असं बघा, आपण ‘नेहमी सोमवारपासून सुरु करणार, एक तारखेपासून सुरु करणार, उद्यापासून सुरु करणार’ असं म्हणतो. का असं म्हणतो याचा विचार केला कधी? दुसरं तिसरं काही नाही हो. आपल्याला हे करणं आवडत नाही हेच मूळ कारण. नाहीतर लगेच आत्तापासून सुरु केलं नसतं का? आवडीची गोष्ट करायला वाट पाहतो का आपण? नाही. न आवडणारी गोष्ट मात्र पुढे ढकलतो. त्यामुळे ती कधी सुरुच होत नाही. आपण आपल्यालाच फसवतो आणि ते आपल्याला माहित असतं. असं सारखं होत राहिल्याने एक निर्ढावलेपण येते व त्याचीही सवय होऊन बेफिकीरपणा येतो. तर शेवटी काय, आपण काहीच कधीच सुरु करत नाही. केलं तरी त्यातून लगेच इन्स्टंट फरक दिसत नसल्याने कंटाळून बंद करतो. सहा महिने-वर्षभर एखादी गोष्ट रोज करायची आहे हा विचारच आपल्याला प्रचंड पर्वतासारखा वाटू लागतो. हे अशक्य आहे हे आपलंच मन आपल्याला सांगतं. कारण आपलं शरीर आळसाला सरावलेलं असतं. हा पर्वत आपण उचलू शकणारच नाही तर प्रयत्नच कशाला करा, असं म्हणून टाळत राहतो. आता हे टाळंटाळ करणेच आपल्याला टाळायचं आहे तेव्हा उद्यापासून, परवापासून, सोमवार, मंगळवार असे काहीच करायचे नाही. फक्त उद्याच्या दिवस काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्या. फक्त उद्यासाठी. परवाचं नंतर बघू. फक्त उद्या करायचं आहे. उद्याच्याच दिवस. एक एक दिवसाचेच ध्येय ठेवा. आपण काल जीवंत होतो, आज जीवंत आहोत. उद्या राहू. इतकंच आपलं आयुष्य समजायचं आणि फक्त तेवढ्या उद्याच्या दिवसासाठी ह्या काही गोष्टी करायच्यात.

तर काय करायचं नक्की…

आपण एक छोटीशी गम्मत करूया. आपणच होऊ आपल्या daily routine चे बिग बॉस. (‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ च्या चालीवर वाचावे.) फार काही नाही करायचं, फक्त आपले मनःचक्षु म्हणजे आपले ‘इनबिल्ड सी सी टीव्ही कॅमेरे’ स्वतःवर फोकस करायचे.

आपल्याला साडे सहा वाजता उठायची सवय असेल तर उद्या सकाळपासून सव्वा सहा वाजता उठायचं ठरवून अलार्म लावायचा. फार नाही फक्त 15 मिनिटं लवकर उठायचं. अलार्म वाजल्यावर तो snooze न करता लगेच डोळे उघडायचे. जर तुम्ही अलार्म स्नुज करत असाल तर पुढचा अख्खा दिवस जणू एक शिक्षा समजून काढण्याची सुरुवात असते ती. तेव्हा अलार्म वाजला की लगेच उठायचं. कंटाळा नो कंटाळा.

डोळे उघडले की आपण पहिले काय करतो??? कदाचित एकासुरात उत्तर येईल मोबाईल नोटिफिकेशन्स चेक करतो. हं, मग आता आपण मोबाईल थोडा उशिरा हातात घेऊ. त्याला सध्या राहू दे जिथे आहे तिथे. त्यापेक्षा उठून आपण पहिले आपल्या पांघरुणाची घडी घालू. अंथरूण आवरून घेऊ. हे एक अगदीच छोटंसं काम पूर्ण केल्याने अंतर्मनात एक सकारात्मक संदेश जातो. ठरवलेली गोष्ट आपण करु शकतो ह्या भावनेने दिवसाची सुरुवात होते व त्याच्या अंमल दिवसभर राहतो. आता यानंतर साधारणपणे आपण प्रातःविधी उरकायला जातो. मोबाईल न घेता त्या कामाला लागू. न्यूजपेपर वाचणे किंवा मोबाईल वर जगाची खबरबात चेक करण्याचं जे काम आहे ते प्रवासात करण्यासाठी किंवा नंतर दिवसभरात फावल्या वेळात करण्यासाठी ठेऊ. टॉयलेटमध्ये बसून फारफार तर आज आपल्याला दिवभरात काय करायचं आहे याची रूपरेषा ठरवू. दात घासणे, दाढी, अंघोळ शांतपणे नीट लक्षपूर्वक करु. हे करतांना मनात इतर कोणतेच विचार आणायचे नाहीत. फक्त त्या क्रियेकडे लक्ष केंद्रीत करायचं. हे वीस-पंचवीस मिनिटे जे करतोय त्याकडेच पूर्ण लक्ष देऊन एक एक सेकंदाची प्रत्येक क्रिया बघायची, त्याची नोंद घ्यायची. ब्रश नक्की कोणकोणत्या दाताला लागतोय, अंगावर पाणी पडल्यावर कसं शरिरावरुन वाहत जातंय. शरीरावर साबणाचा फेस कसा फील होतोय… ह्या लहानसहान गोष्टींची नोंद घेत राहायची. हेच आपलं ‘मेडिटेशन’. मेडिटेशन मेडिटेशन म्हणतात ते हायफाय दुसरं काही नसतं. फक्त आत्ताच्या क्षणात जगणे म्हणजे मेडिटेशन. बघा रोजची रटाळ कामे करता करताच आपले मेडिटेशन सुद्धा झाले की नाही?

सकाळी उठल्यापासून, घरातले सदस्य आणि घराबाहेर पडल्यावर दिवसभरात दिसणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीशी नजरानजर झाल्यावर एक छोटंसं स्माईल देऊ. गुड मॉर्निंग वगैरे म्हणणं शक्य असेल तर अजूनच छान. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सहकाऱ्यांना हाय, हॅलो करून कामाला सुरुवात करू.

लंचटाईम मध्ये नेेहमीच्या डब्यासोबत एखादी तरी कच्ची भाजी खाऊ. म्हणजे एखादाच टोमॅटो, अर्धी काकडी, एक तुकडा गाजर, बीट वगैरे वगैरे. फार काही जास्त नको.

ऑफिसमधून घरी आल्यावर नुसतंं बूट, सॉक्स, कपडे सगळं नीट जागच्या जागेवर ठेवलं तरी एखादी गोष्ट व्यवस्थित पूर्ण केल्याचं समाधान मिळतं. खूप पॉझिटीव्ह वाटतं. हे करत असतांना लक्ष पूर्ण त्या क्रियेकडे असू द्यावे. म्हणजे ऑफिसचे विचार आणि घरात शिरल्यावरचे आयुष्य यात एक गॅप निर्माण होते. ही गॅप खूप शक्तिमान असते. ऑफिसमध्ये कितीही काहीही झालेले असू देत. ते तुम्ही आता घरी आल्यावर निस्तरु शकत नाही. तेव्हा आता घरातला वेळ त्यासाठी का घालवावा. तसे केले तर घरातलाही वेळ हातचा जाईल आणि ऑफिसातल्या प्रॉब्लेमबद्दल तसे होणारे तर काहीच नाही. आलं लक्षात?

फ्रेश झाल्यावर थोडा वेळ घरातल्यांशी गप्पा माराव्यात, मुलांशी खेळावं किंवा सहज एखादा फेरफटका मारून यावं. दिवसभरात एकदा तरी किमान दहा मिनिटं सलग चालावं. अगदी पाच मिनिट दहा मिनिट झपाट्याने चाललं तरी खूप. हा लेख वाचायला तुम्हाला जितका वेळ लागला तितकाच वेळ चाला हवे तर. “रोजचे पाच किमी, दहा किमी चाललेच पाहिजे”वाले पर्वताकाय विचार हवेत कुणाला इथे?

जेवण शक्यतो सगळ्या कुटुंबासोबत बसून करावं. जेवताना कटाक्षाने मोबाईल दूर आणि टीव्ही बंद ठेवावा. प्रत्येक घास चावतांना तोंडातले रस कसे पाझरत जिभेवर येतायत त्याकडे लक्ष द्या. भाजीपोळी दातांखाली येऊन कशी एकमेकांत मिक्स होते तिकडे लक्ष द्या. त्या दोन चवी एकजीव होतांना काय बदल अनुभवास येतात त्याकडे लक्ष द्या. बघा अशा तर्हेने जेवण झाल्यावर खूप समाधान वाटेल.

झोपण्यापूर्वी किमान तासभर आधी टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल यांचा निरोप घ्यावा.

दिवसभरात काय काय केलं आणि उद्या काय करायचं आहे याचा आढावा घेऊन व उद्याची पूर्व तयारी करून आजच्या दिवसाला पूर्णविराम द्यावा. झोपण्यापूर्वी एखाद्या पुस्तकाची काही पानं वाचावीत नाहीतर छानपैकी गाणी किंवा शांत music ऐकावं. उद्याचा दिवस आजच सुरु करावा. म्हणजे उद्या उठून हेच सर्व रिपिट करणार आहोत ह्याची उजळणी मनाला करुन द्यायची. बास…. संपला आपला दिवस.

उद्या पुन्हा नवीन सकाळ, नवीन दिवस, नवीन 24 तास अशाच छोट्या छोट्या गोष्टी पुन्हा नव्याने…

हे सगळे लहान सहान बदल आपल्याला किमान 21 दिवस करायचे आहेत. फक्त 21 दिवस. ह्या मुळे काय झालं, काय होणार आहे आणि पुढे काय करायचं आहे ते 21 व्या दिवशी संध्याकाळी समजेलंच…

So Get Set Go… Your 21 day’s challenge starts RIGHT NOW… no tomorrow, Monday, First date. just at this very time. RIGHT NOW. BE in the NOW.

Share your love