उपवासाची शास्त्रशुद्ध पद्धत

‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ ही म्हण तर महाराष्ट्रात ऐकली नसेल असा मनुष्य शोधून सापडणार नाही, त्याला कारणही तसेच आहे.

कोणताही उपवासाचा दिवस आठवून पहा… उपवासाचा दिवस उजाडला की जी सकाळ पासून सुरुवात होते की त्याची विचारता सोय नाही. आज उपवास आहे मग चहा सोबत पोळी, बिस्कीट, टोस्ट, खारी खाऊन चालणार नाही. मग थोडासा बटाट्याचा चिवडा, तळलेल्या साबुदाण्याच्या पापड्या, पापड, चकली, हे अन ते असा ‘छोटासा’ नाश्ता. उपवासाने उगाच भूक भूक होऊन डोकं नको दुखायला, चक्कर नको यायला म्हणून मग फराळाचे होईपर्यंत दाण्याचा नाहीतर सुकामेव्याचा किंवा राजगिऱ्याचा लाडू. या छोट्या छोट्या खाण्याच्या अधेमध्ये फक्त दोन चार वेळा घोट घोट चहा. मग दुपारी फराळाला साबुदाण्याची खिचडी, भगर, शेंगदाण्याची आमटी, तळलेले किमान चार प्रकार, एखादी कोशिंबीर, एखादा तोंडी लावायला चिवडा आणि हे सगळं झाल्यावर गोडाचा किमान एकतरी पदार्थ हवाच. असं सगळं उपवास ‘सोडे’ पर्यन्त एका मागोमाग एक सुरु असतं.

असा हा एखादा उपवास म्हंटलं की खरंतर आपण आदल्या दिवशीपासूनच तयारीला लागतो. जास्तीचं दूध आणा, बटाटे आणा, शेंगदाणे भाजून ठेवा, दाण्याचं कूट करून ठेवा, साबुदाणा भिजत घाला, दही लावा, ह्याची तयारी करा, त्याची सोय करा. जितका विचार आणि मेहनत आपण रोजचा स्वयंपाक करायला करतो त्याच्या पेक्षा जास्त उस्तवार आपण उपवासासाठी करतो. किती हा विरोधाभास…

खरं पहाता हे उलट असायला हवं नाही का… उपवासाची मूळ संकल्पनाच आपण पार बदलून टाकली आहे. उपवास हा प्रकार आपल्या पूर्वजांनी शोधून काढला तो शरीराला, पोटाला आराम देण्यासाठी. आठवड्यातून एक किंवा दोन दिवस उपाशी राहणे ही शरीराची अगदी सामान्य नैसर्गिक गरज आहे. ती त्यांनी अचूक ओळखली होती. आणि माणूस खायला मिळालं की नुसता अधाशासारखा खात राहतो हेही त्यांनी जोखलं होतंच. मग अशा अधाशांना सरळ भाषेत, वैज्ञानिक भाषेत समजावून सांगितले तर कुठे ऐकायचे ते..? म्हणून धार्मिक गोष्टींशी जोडून दिला उपवास. सर्व धर्मात, पंथात कित्येक शतकांपासून उपवासाची संकल्पना वेगवेगळ्या स्वरुपात आहे. अनेक धर्माचे अनुयायी त्याचे नीट काटेकोर पालन करतात. पण आपण मात्र अक्षरशः उधळलो आहोत. उपवास म्हणजे फक्त देवधर्मकर्मकांड इतक्यापुरता विचार करुन मूळ योजना फसवली आहे. खरेतर “उपवास म्हणजे रुचीपालट” असा भयंकर अर्थ आपण करुन टाकला आहे. रोज जेवतो त्यापेक्षा ‘वेगळं काहीतरी‘ खायला हवं म्हणून इतके पदार्थ शोधून काढले आहेत. “हे चालतं, ते चालतं” असे आपल्याच मनाने समजूत घालून नवनवे चमचमीत तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थ जन्माला घातलेत, गेल्या पन्नास वर्षातच. ज्याच्या नावाने आपण हे उपवास करतो तो देवही गालातल्या गालात हसत असेल आणि म्हणत असेल, “काय रे पोरांनो, मला फसवताय की स्वतःलाच फसवताय?”

बघा, आपण स्वतःलाच फसवत आहोत. उपवासाची संकल्पना अगदी साधी आहे. त्या दिवशी जेवायचे नाही. बास! केवळ पाणी प्यायचे. त्यासोबत असलेच तर पूर्वी एखादे दुसरे फळ, कंदमुळ असायचे सोबतीला. आता कंदमूळच्या नावाखाली जमिनीच्या खाली उगवणारे बटाटे, रताळी आपण पचवली. भरपूर साखर घातलेला चहा चार-सहा वेळा घशात ओतला. असे करत करत आपण रोजच्या जेवणापेक्षा जास्तीच्या कॅलरीज तर गट्टम करतोच, पण मूळ उद्देशापासून जे फायदे होणार होते त्याच्या अगदी उलट केल्याने, उपवास केला नसता तर जे झाले नसते ते नुकसान करुन बसतो. देव कसा माफ करणार मग? तो बरोबर कर्माची फळं देतोच.

घाबरु नका. आता झालं ते झालं. यापुढे कडकडीत शास्त्रशुद्ध उपवास करायचा. करायचा म्हणजे करायचाच…

काय करायचं मग आता नेमकं…?

अहो अगदी सोप्पंय, काही रॉकेट सायन्स नाहीये त्यात. जीभेवर आणि मनावर कंट्रोल ठेवा फक्त.

    • उपवास करणं म्हणजे त्यादिवशी पंचनसंस्थेला शक्य तितका आराम देणं. शक्यतो कमीत कमी खाणं.
    • दूध, दही, ताक, सुकामेवा, शेंगदाणे, फळं, नारळपाणी असं काहीतरी पौष्टिक पण थोडंसचं खावं प्यावं.
      पौष्टिक आहे म्हणून हे सगळंच भरपूर प्रमाणात पोटभर, मनभर खाऊ नये.
    • घन खाद्यपदार्थ स्वतःच्या हाताच्या मुठीइतके दिवसभरातून एकदाच खावे. म्हणजे शेंगदाणे खायचे असतील तर फक्त शेंगदाणेच मुठभर खावे, मग दिवसभर दुसरे काही खाऊ नये. सुकामेवा खायचा तर सर्व प्रकारचे मिळून एक मुठभर होईल इतके खावे, नंतर दुसरे काहीही खाऊ नये.
    • द्रव पदार्थ दिवसातून एक एक ग्लास दोन वेळा घ्यावे. (२०० मीली चा एक ग्लास) सकाळी दूध घेतले तर दुपारी ताक/नारळपाणी घ्यावे.
    • जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा पुरेसं पाणी प्यावं.
    • जमल्यास थोडा आराम करावा. शक्यतो शारीरिक कष्ट, धावपळीचे काम करु नये.
    • मन प्रसन्न होईल असं काही वाचन किंवा श्रवण करावं. इश्वरध्यान, चिंतन, मनन करावे. हा मानसिक उपवास.
    • चहा कॉफी अजिबात घेऊ नये. फक्त आलं (अद्रक) घालून उकळलेले गरम पाणी घ्यावं दिवसातून दोन वेळा.
    • तळलेले पदार्थ खाऊ नयेत. थोडक्यात चुलीला म्हणजे गॅसशेगडीलाही आराम द्यावा.
    • गोड पदार्थ खूप खाऊ नयेत. शक्यतो खाऊच नये. प्रसाद म्हणून अर्धा पेढा, चिमूटभर साखर चालेल.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उपवासाला ‘हे चालतं का ते चालतं का’ ह्या प्रश्नाच्या फंदातच पडू नये. जेव्हा खायचंच नाहीये तर का प्रश्न? ज्या गावाला जायचेच नाही त्या गावाचा रस्ता विचारायाचाच का?

आता म्हणाल, “पण आम्हाला भूकेने चक्कर आली तर काय हो?”, तर मंडळी चक्कर भूकेने येत नसते, ती येते मेंदूत आवश्यक पाणी, खनिजे, ऑक्सिजन आणि ग्लुकोज गेले नाही तर.. बारा-सोळा तास उपाशी राहिल्याने शरीराला ढिम्म फरक पडत नसतो. तरी चक्कर आल्यासारखे, कासाविस झाल्यासारखे आणि गरगरल्यासारखे होत असेल तर आपल्या आरोग्यात काहीतरी गडबड आहे असे समजावे. आपल्याला जर भूकेमुळे चक्कर येण्याचा त्रास असेल तर आम्हाला 7972948428 ह्या नंबरवर “Cravings” असा मेसेज व्हॉट्सप करुन संपर्क करा. आम्ही योग्य ते मार्गदर्शन करु.

आपल्या पूर्वजांनी ज्या मर्यादा आखून दिल्या होत्या त्या काही खर्‍याखुर्‍या कारणास्तव होत्या. असे नाही की त्याकाळी अभाव होता, अभाव तर होताच पण सुकाळ असतांनाही त्यांनी आपल्या नियमांना भरकटू दिले नाही. पण आजच्या काळात बहुतेक असा समज झाला की त्याकाळी अभाव होता म्हणून सगळे मोजून मापून खात असतील. तर तसे नाही. आज आपल्याला अन्नधान्य सहज उपलब्ध आहे म्हणून भरमसाठ खाणं होतंय हे तर सत्यच आहे, पण पूर्वजांची ‘गरजेपुरतं खावे’ ही शिकवण आपण विसरत चाललोय त्याचेही परिणाम आहेत. तीच शिकवण परत आठवूयात… शास्त्रशुद्ध उपवास करुयात, तन आणि मन निर्मळ करुया… तनाचे आणि मनाचे आरोग्य परत मिळवूया…

Share your love