साहित्य: 1 कप दही, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 कढीपत्त्याची पानं, 1 टीस्पून किसलेलं आलं, 1 टीस्पून मोहोरी, 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून सैंधव, 1 टेबलस्पून कोथिंबीर
कृती: एका पसरट भांड्यात दही घालून ते 2 मिनिटं चांगलं फेटून घ्या. दही छान मऊ एकसारखं व्हायला हवं. दह्यात सैंधव घालून नीट एकत्र करून घ्या आणि हे भांड बाजूला ठेवून द्या. आता फोडणीची तयारी करा.
कढलं/फोडणीच्या लहान कढईत तेल घालून ते चांगलं कडकडीत तापू द्या. आता त्यात मोहोरी घाला. गॅसची आच मंद करा. मोहोरी पूर्ण तडतडली की जिरं, किसलेलं आलं, हिरव्या मिरच्या, हळद, लाल मिरची पूड आणि कढीपत्त्याची पानं या दिलेल्या क्रमानेच फोडणीत घाला.
आता ही फोडणी अलगद हळुवारपणे फेटलेल्या दह्यावर घाला. हलक्या हाताने फोडणी दह्यात मिसळा. वरून कोथिंबीर घालून पुन्हा एकदा नीट हलकंस हलवून घ्या. मस्त चविष्ट दही तडका तयार.
हा दही तडका भाकरी, पोळी सोबतच नव्हे तर भातासोबत ही उत्तम लागतो. तसंच पराठे, थालिपीठ, धिरडी, डोसे यासोबतही तोंडीलावणं म्हणून खाऊ शकता. झटपट तयार होणारा दही तडका हा एक पौष्टिक पदार्थ.