साहित्य: एक किलो चिकन, दीड कप बारिक चिरलेला कांदा, 1 कप बारिक चिरलेला टोमॅटो, 12-15 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा कप बारिक चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, 7-8 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 2-3 हिरवे वेलदोडे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंगा, 1 जायपत्री/जावेत्री, 2 तमालपत्र, 2 टीस्पून हळद, 2-3 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून काश्मिरी मिरची पूड, 2 टीस्पून धणे पूड, 2 टीस्पून जिरे पूड, मीठ, अर्धा कप फेटलेली साय, 2 टेबलस्पून घट्ट बटर, 2 टेबलस्पून काजूची पेस्ट (ऐच्छिक), 4 टेबलस्पून तेल/तूप, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, अर्धा टीस्पून साखर
कृती: प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावं. या पाककृती साठी शक्यतो चिकनचे तुकडे मोठेच राहू द्यावेत. चिकनला 1 टीस्पून हळद, थोडंस मीठ आणि लिंबाचा रस चोळून ते मुरण्यासाठी ठेवून द्यावं. किमान 15 ते 30 मिनिटे.
आलं व लसूण एकत्र जाडसर कुटून घ्यावं.
एका जाड बुडाच्या कढईत 2 टेबलस्पून तेल/तूप तापल्यावर त्यात काळी मिरी, मसाला वेलची, वेलदोडे, दालचिनी, लवंगा, जायपत्री हे सर्व मसाल्याचे पदार्थ घालून परतून घ्यावे. तमालपत्र आता घालायचे नाही. ते नंतर वापरायचे आहे.
आता खड्या मसाल्यावर कांदा घालून तो गडद सोनेरी रंगावर परतून घ्यावा. मग त्यात कुटलेलं अर्ध आलं-लसूण वाटण घालावं. त्याचा उग्र वास कमी होईपर्यंत परतावं. आता त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि टोमॅटो घालावा. टोमॅटो घातल्यावर लगेच त्यावर साखर घालून परतावे. नंतर मीठ, हळद, लाल मिरची पूड, धणे पूड, जिरेपूड आणि अर्धा कप पाणी घालून 2-3 मिनिटे मसाले नीट परतून घ्यावे.
आता त्यात चिकन घालून तीव्र आचेवर 2-3 मिनिटे परतून घ्यावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 मिनिटे चिकन मसाल्यात शिजू द्यावे.
आता गॅस बंद करावा. कढई गॅस वरून खाली उतरवून घ्यावी. मसाल्यातुन चिकनचे तुकडे एका भांड्यात काढून घ्यावेत व त्यावर झाकण ठेवून ते भांडे बाजूला ठेवून द्यावे.
एका भांड्यात 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवावे.
कढईतला मसाला 2 मिनिटं थोडा गार होऊ द्यावा. त्यानंतर तो मिक्सरमध्ये वाटून एकदम बारिक करून घ्यावा.
आता पुन्हा तीच कढई गॅस वर ठेवावी. तीव्र आचेवर तेल/तूप तापले की त्यात तमालपत्र आणि उरलेले आलं-लसणाचे वाटण घालून परतावे. मिक्सरवर बारिक केलेले मिश्रण त्यात घालावे. गरम केलेले पाणी थोडे मिक्सरच्या भांड्यात घालून सगळे मिश्रण नीट काढून घ्यावे व कढईत घालावे. उरलेले गरम पाणी कढईत घालावे व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे.
आता त्यात थोडे मीठ (आधी चिकन मुरू देताना आणि दुसऱ्यांदा टोमॅटोवर मीठ घातले आहे हे लक्षात घेऊन मीठ घालणे) काश्मिरी मिरचीची पूड, कसुरी मेथी, काजूची पेस्ट, बटर आणि आधी अर्धे शिजवून ठेवलेले चिकन घालावे. चिकन आणि सर्व मसाल्याचे मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यावर कोथिंबीर घालावी आणि पुन्हा एकदा चिकन नीट हलवून झाकण ठेवावे. मंद आचेवर 12-15 मिनिटे चिकन शिजू द्यावे.
त्यानंतर झाकण काढून या शाही चिकन लबाबदार मध्ये ताजी छान फेटलेली साय हळूहळू घालुन ही शाही पाककृती पूर्ण करावी. गॅस बंद करावा. पाच मिनिटे हे शाही चिकन झाकून ठेवावे.
गरमागरम शाही चिकन लबाबदार भाकरी, पोळी, पराठा किंवा भातासोबत खाण्यासाठी तयार. अप्रतिम स्वाद.