चीज कोबी धिरडे

साहित्य:

१ कप बारीक चिरलेला कोबी, १ कप बारीक चिरलेला टोमॅटो, १ कप बारीक चिरलेला कांदा, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, ५-६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, २ कप तांदळाचं पीठ, १ कप बेसन, २ टीस्पून हळद, १ टीस्पून लाल मिरची पूड, २ टीस्पून जिरे पूड, १ टीस्पून हिंग, २ टीस्पून सैंधव, चवीनुसार जाडे मीठ बारीक कुटलेले, चीज, तेल

कृती:

तेल आणि चीज सोडून इतर सगळे साहित्य एका खोलगट भांड्यात नीट एकत्र करावे. आता त्यात थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित हलवून घ्यावे. चांगली जाळी पडण्यासाठी मिश्रण चांगले फेटून घ्यावे.

एकीकडे तवा तापत ठेवा. तवा तापला की त्यावर थोडेसे तेल घालून चमच्याने मिश्रण गोलसर पसरवून घ्या. आता धिरड्याच्या सगळ्या बाजुंनी थोडेसे तेल घाला. झाकण ठेवून एक वाफ काढा.

नंतर धिरडे पालटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्या. दोन्ही बाजुंनी लालसर खरपूस भाजले गेले पाहिजे.

आता धिरड्यावर बारीक किसलेले चीज घालून त्याची घडी घाला. चीज घातल्यानंतर धिरड्याची घडी दोन्ही बाजुंनी थोडी शेकून घ्या. आता तव्यावरून खाली उतरवून धिरड्याचे तुकडे करून घ्या.

सॉस किंवा चटणी सोबत हे धिरडे उत्तम लागते.

वर दिलेल्या प्रमाणात मध्यम आकाराची ६-७ धिरडी होतात.

Share your love