साहित्य:
३ कप बारीक चिरलेला कोबी,
१ कप बारीक चिरलेला कांदा,
१ कप बारीक चिरलेली कोथिंबीर,
५-६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,
१०-१५ कढीपत्त्याची ताजी पानं बारीक चिरलेली,
२ टीस्पून जिरे पूड,
२ टीस्पून धणे पूड,
१ टीस्पून ओवा,
१ टीस्पून हळद,
१ टीस्पून तिखट,
१ टीस्पून हिंग,
चवीपुरतं कुटलेलं जाडं मीठ,
४ चिमूट सैंधव,
दीड कप ज्वारीचं पीठ,
अर्धा कप तांदळाचं पीठ,
अर्धा कप बेसन,
तेल.
(एवढ्या साहित्यात मध्यम आकाराची ७ ते ८ थालीपीठं होतील)
कृती:
तिन्ही पीठं आणि तेल सोडून बाकी सगळे साहित्य हाताने नीट एकत्र करून घ्या. आता त्यात तिन्ही पीठं घालून गरजेपुरते थोडेसे पाणी घाला. नीट गोळा बनवून घ्या.
थालीपीठ थापण्यासाठी तेलाची रिकामी पिशवी नीट कापून सरळ करून घ्या. आता एकीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा तापला कि त्यावर थोडे तेल लावून घ्या. तवा तापेपर्यंत पिशवीवर बोटाने थोडे तेल लावून त्यावर थालीपीठ थापून त्याला मध्यभागी एक छिद्र करून घ्या. थालीपीठ तव्यावर टाकून त्याच्या सर्व बाजूने आणि मधल्या छिद्रात थोडे तेल घाला. आता त्यावर झाकण ठेवा. एक वाफ निघाली की झाकण काढून घ्या आणि थालीपीठ उलटा. दुसरी बाजूही लालसर गुलाबी छटा येईपर्यंत भाजावी. थालीपीठ तव्यावरून उतरवलं की त्यावर साजूक तूप किंवा बटर घाला.
हे थालीपिठ दही, लिंबाचं लोणचं किंवा सॉस सोबत खाऊ शकता.