भाकरी मग ती ज्वारी ची असो बाजरीची असो नाहीतर नाचणी किंवा तांदळाची, भाकरीची बातच काही और असते.
पारंपरिक आणि जुन्या खानपानाच्या पद्धतीनुसार आपण विविध धान्यप्रकार वापरतो. मात्र आजकालच्या धावपळीच्या शहरी जीवनपद्धतीमुळे आपल्या रोजच्या आहारातला असणारा भाकरी हा पौष्टिक पदार्थ गेल्या काही वर्षात फारच मागे पडला आहे. गव्हाच्या पोळीने आपल्या जेवणात इतकं अतिक्रमण केलंय की आता आपण पोळीशिवाय आपल्या जेवणाचा विचारच करू शकत नाही. आजकाल लोक खास “चुलीवरची भाकरी” खाण्यासाठी शंभर किलोमीटर दूर जाऊन एखादं हॉटेल गाठतात. पोट आणि मनही तुडुंब भरे पर्यंत त्या भाकरीचा आस्वाद घेतात.
पण तीच भाकरी रोजच्या जेवणात समाविष्ट करा म्हंटलं की आपल्या चेहऱ्यावर अनेक शंका कुशंकांच जाळं पसरतं. “भाकरी आरोग्यासाठी कशी उत्तम आहे” हे सांगणारे भले मोठे मेसेज आपण फेसबुक आणि व्हाट्सअॅ.प वर वाचतो, शेअरसुद्धा करतो. पण घरी भाकरी करायचं मात्र टाळतो किंवा केलीच तरी आठवड्यातून फक्त एखाद-दुसऱ्या वेळी. त्याचं कारण आहे की गव्हाने आपल्या मेंदूला जे अतिशय घातक असे व्यसन लावले आहे तसे भाकरी लावू शकत नाही. भाकरीत व्यसन लावणारा कोणताही घटक नाही, त्यामुळेच बरेचदा ती आपणहून रोज रोज खावीशी वाटत नाही. भाकरी करण्यात न जमण्यासारखे, किचकट असे काहीही नाही. भाकरीसारखा सोपा, झटकन होणारा, पौष्टिक आणि पोटभरीचा दुसरा पदार्थ नसावा.
100 ग्रॅम बाजरीत 11.6 ग्रॅम प्रोटीन, 67.5 ग्रॅम कार्बोहाइड्रेट, 8 मीलीग्रॅम आयर्न व 132 मायक्रो ग्रॅम कैरोटीन आहे जे आपल्या डोळ्यांसाठी गरजेचे असते. 100 ग्रॅम बाजरीतून आपल्याला 361 कॅलरीज मिळतात.
100 ग्रॅम ज्वारीतून आपल्याला 10.6 ग्रॅम प्रोटीन, 66.2 ग्रॅम कार्बोहाइड्रेट, 3.6 ग्रॅम फॅट, 2.7 ग्रॅम फायबर सह 329 कॅलरीज आणि अनेक आवश्यक घटक जसे कॅल्शियम, मॅग्नॅशियम, आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनिज, झिंक, इत्यादी मिळतात.
100 ग्रॅम नाचणी मध्ये 72 ग्रॅम कार्ब्स, 7.3 ग्रॅम प्रोटीन्स, 1.4 ग्रॅम फॅट्स, 2.7 ग्रॅम मिनरल्स असतात, 100 ग्रॅम नाचणीत 344 मिलिग्राम कॅल्शियम असते जे इतर सर्व कॅल्शियमसमृद्ध खाद्यपदार्थांमध्ये सर्वात जास्त आहे. म्हणजे नाचणी कॅल्शियमची खाणच आहे असे म्हटले तरी हरकत नाही. कॅल्शिअयमसाठी दूधापेक्षा नाचणीचे सेवन जास्त उपयोगी ठरते. यासोबतच विटामिन ए आणि बी तसेच आयर्न म्हणजे लोहाचेही प्रमाण चांगले असते.
या बहुगुणी भाकरीसाठीच्या काही खास टीप्स देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला भाकरी रोज रोज खायला आवडेल आणि करायलाही कंटाळा येणार नाही. सोबत वजन नियंत्रणात राहायलाही मदत होईल.
भाकरी साठी तुम्ही खालील पैकी कोणतंही पीठ वापरू शकता.
1) ज्वारी: फक्त ज्वारी दळून आणायची. हे पीठ 5 ते 6 दिवसांत संपवायचं नाहीतर त्याचा कस कमी होऊ शकतो. पूर्वी बायका दररोज सकाळी उठून जात्यावर धान्य दळायच्या, त्याचे कारण कसदार पीठ मिळावे हेच.
2) बाजरी: फक्त बाजरी दळून आणायची. हे पीठ 5 ते 6 दिवसांत संपवायचं नाहीतर त्याचा कस कमी होऊ शकतो
3) ज्वारी + बाजरी: ज्वारी आणि बाजरी समप्रमाणात एकत्र करून दळून आणावी. हे पीठही 5 ते 6 दिवसांत संपवायचं नाहीतर त्याचा कस कमी होऊ शकतो.
4) 1 किलो ज्वारी मध्ये 200 ग्रॅम अख्खे काळे उडीद किंवा काळी उडदाची डाळ असे एकत्र करून दळून आणावे. हे पीठ महिनाभर चांगले राहते.
5) 1 किलो बाजारी मध्ये एक मोठी वाटी हिरवे मुग आणि एक लहान वाटी तांदूळ एकत्र करून दळून आणावे. हे पीठ महिनाभर चांगले राहते.
6) 1 किलो तांदूळ व 50 ग्रॅम जिरे एकत्र करून दळून आणावे. हे पीठ महिनाभर चांगले राहते.
7) 1 किलो नाचणी व पाव किलो डाळ्या (हरभरा डाळीच्या चिवड्यासाठी वापरतो त्या) एकत्र करून दळून आणावे. हे पीठ महिनाभर चांगले राहते.
8) अर्धा किलो राजगिरा आणि अर्धा किलो वरई/भगर एकत्र करून दळून आणावे. हे पीठ दोन-तीन आठवडे चांगले राहते.
कोणतीही भाकरी करताना त्यात साधे फ्री फ्लो मीठ (टेबल सॉल्ट) वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे.
साधारण 2 वाट्या पीठ घेतलं तर त्यात सैंधव, धणे पूड, जिरे पूड, हिंग, ओवा हे सगळं प्रत्येकी 2 चिमूट घालायचं आणि सगळं नीट एकत्र करून मग साध्या पाण्यात पीठ मळायचं. ह्यामुळे भाकरी अजून पौष्टिक तर होतेच पण अतिशय चविष्टही होते. अशी भाकरी नुसत्या साजूक तुपासोबत किंवा एखाद्या लोणच्यासोबतही खूप छान लागते.
ज्वारी, बाजरी, नाचणी अशी कोणत्याही धान्याची भाकरी करताना त्यात भाकरीचे पीठ मळते वेळी थोडेसे तांदळाचे पीठ घालावे. म्हणजे भाकरी मऊ लुसलुशीत होते. कोरडी पडत नाही.
भाकरी डब्यात न्यायची असेल तर निम्मे तांदळाचे पीठ व निम्मे इतर धान्याचे पीठ घेऊन भाकरी करावी.
किंवा ज्वारी बाजरी नाचणी या पिठांची सुद्धा उकड काढायची, तांदुळाच्या भाकरीसाठी काढतात तशी.
कढईत एक वाटी पाणी आणि आवडीप्रमाणे मीठ व थोडंस तेल घालून उकळून घ्यावे. त्यात एकच वाटी ज्वारीचे/बाजरीचे/नाचणीचे पीठ घालावे झाकण ठेवून वाफ काढावी.
गॅस बंद करून उकड झाकून ठेवावी.
5 ते 7 मिनिटांनी उकड परातीत काढून व्यवस्थित 5 मिनिट मळून घ्यावी.
या तयार पिठाचे लाटून सुरेख फुलके होतात.
मग आज पासून सुरुवात करायची ना मस्त भाकरी खायला?
अशाच हेल्दी फूड टिप्स, रेसीपीसाठी Like करा Betterfast Lifestyle चे Facebook page: https://www.facebook.com/BetterFast
© BetterFAST Lifestyle Consultancy, PUNE.
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action) www.betterfast.in