जर तुम्हाला एखादा कप कडक आणि मूड रीफ्रेश करणारा दमदार चहा प्यायची इच्छा असेल आणि त्याचसोबत तो कपभर चहा तुम्हाला इतरही अनेक आरोग्यदायी फायदे देत असेल तर आवडणार की नाही?
असा चहा तुम्हाला हवा असल्यास ‘आले-लिंबाचा’ चहा तुमच्यासाठीच निर्माण केलेला आहे असे समजा.
हा चहा करण्यासाठी इतर कोणत्याही पदार्थांची गरज नाही. फक्त कपभर पाण्यात थोडे आले (अदरक) चेचून घालायचे, गॅसवर त्याला एक छानशी उकळी येऊ द्यायची, त्यानंतर कपात ते पाणी नीट गाळून घ्यायचे. त्यात चमचा भर लिंबाचा रस घालायचा की झाला आपला आरोग्यदायी चहा तयार!
ह्यात इतर कोणतीही चहापावडर किंवा मसाला पावडर घालायची गरजच नाही.
ह्या आले लिंबू चहाचे आरोग्यासाठी होणारे फायदे माहिती आहेत का?
आलं (अदरक) हे हजारो वर्षांपासून आपल्या आशिया खंडात, भारत आणि चीन देशांमध्ये छोट्यामोठ्या आजारात औषधी म्हणून वापरले जात आहे. मध्ययुगीन काळात आले युरोपात पोचले, आज तिकडे आल्यापासून गोड कँडीज तयार करतात.
आले हे अनेक स्वरुपात वापरता येते. ताजे रसरशीत आले, वाळवून सुंठ केलेले, आल्याचे लोणचे, सुंठ-पावडर किंवा आल्याचा किस करुन वेगवेगळ्या रेसीपीत वापरला जातो.
लिंबू तर आपल्याला माहिती आहेच की चटकदार आंबट चवीचे हे फळ विटामीन सी चा नैसर्गिक स्रोत आहे. ह्यात अँटी-ऑक्सिडेंट्स आहेत जे प्रदुषण व मॉडर्न लाइफस्टाइलमुळे होणार्या आरोग्याच्या हानीला कमी करण्यास मदत करतात.
आले आणि लिंबू दोन्ही मिळून आपल्या एक करकरीत चटकदार पण फ्रेश करणारी चव मिळवून देतात.
आले लिंबू चहा कशाप्रकारे आपल्या आरोग्यास मदत करतो?
मळमळ
काही कारणाने जर पोटात गडबड झाली असेल, मळमळ किंवा उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा वापर केला जातो. आले-लिंबू च्या एकत्रित वापराने मळमळ व उलटीत फायदा होतो हे तर आता आधुनिक वैद्यकशास्त्राने देखिल अभ्यासाअंती मान्य केले आहे.
वजन नियंत्रण (वेट लॉस)
आले लिंबाचा चहा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करु शकतो. लिंबाच्या रसात अशी तत्त्वे आहेत जी इन्शुलीन रेझिस्टन्स कमी करतात, शरीरातले फॅट जाळायला मदत करतात. आल्यामुळे भूकेची भावना कमी होते, सारखी भूकभूक होत नाही, त्यामुळे जास्त अनावश्यक कॅलरीज पोटात जात नाहीत व त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
रोगप्रतिकारक्षमता
विटामिन सी व अँटी-ऑक्सिडेंट्सचा एक चांगला नैसर्गिक स्रोत असलेले लिंबू आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. आले ही अनेक प्रकारच्या जीवाणूंपासून आपले रक्षण करुन आपली रोगप्रतिकारक्षमता वाढवते.
हृदयरोग व लिव्हरच्या संदर्भात
हृदयरोग असणार्या व्यक्तींना आले लिंबू चहा प्यायल्यास मदत होते असे म्हटले जाते. त्याचबरोबर अशा रोगांपासून बचाव होण्यासाठी आले-लिंबू चहा उपयुक्त आहे.
वेदनाशामक
अंगावर येणारी सूज, किंवा इतर दुखणे, आर्थ्रायटीस व डोकेदुखी ह्यात आले-लिंबू चहा उपयोगी असतो. दिवसांतून एक ते दोन वेळा अशा प्रकारे चहा करुन प्यायल्यास अंगदुखी, ठणक कमी होण्याची शक्यता असते.
अता हा आले लिंबू चहा कसा करायचा?
आले लिंबू चहाची रेसिपी अत्यंत साधी व सोपी आहे. कोणीही हे करु शकते.
साहित्यः
१. एक इंच ताजे रसरशीत आले
२. एक लिंबू
३. चार कप पाणी
४. अगदी छोटी चिमूट ताजी दालचिनी पावडर (आवडत असल्यास, गरजेची नाही)
कृती:
– सर्वप्रथम आल्याचा तुकडा किसून किंवा चेचून घ्यावा.
– चार कप पाणी एका भांड्यात घेऊन उकळायला ठेवावे .
– भांड्यातले पाणी उकळायला लागले की त्यात किसलेले-चेचलेले आले टाकावे.
– आले घातलेले पाणी दहा ते वीस मिनिटे उकळू द्यावे म्हणजे आल्याचा सर्व अर्क पाण्यात उतरेल.
– वीस मिनिटांनी एक लिंबू पातळ काप करुन त्या उकळत्या पाण्यात टाकावे. (किंवा लिंबाचा रस काढून तो रस घालू शकता)
– त्यानंतर पाच मिनिटांनी गॅस बंद करावा.
– हे उकळलेले पाणी नीट गाळण्याने गाळून कपात चहा ओतून घ्यावा.
हा चहा आपण दिवसभरात कोणत्याही वेळी घेऊ शकता. थंड किंवा गरम अशा दोन्हीप्रकारे घेऊ शकता.
महत्त्वाचा फायदा असा की चहापत्तीची पावडर, साखर व दूधापासून बनवलेल्या चहाची भयंकर सवय लागते, एकप्रकारे व्यसनच. तसे काहीही ह्या आले लिंबाच्या चहामुळे होत नाही. होतात तर फक्त आरोग्याचे फायदे.
चला तर मग, मूड आणि आरोग्य सुधारणारा आले लिंबाचा चहा घ्यायला सुरुवात करताय ना?
हा लेख शेअर करायला विसरू नका.
Need healthy life?