बाजरीचा उपमा

साहित्य: 2 कप बाजरीचं पीठ, एक कप जाडसर चौकोनी चिरलेला कांदा, अर्धा कप जाडसर चौकोनी चिरलेेली सिमला मिरची, 5-6 हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या, 4-5 लसूण पाकळ्या, एक इंच आल्याचा तुकडा, 2 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून तूूूप, सैंधव, पाव कप बारिक चिरलेली कोथिंबीर, पाव कप बारिक किसलेलं खोबरं, 2 टेबलस्पून घट्ट चिंचेचा कोळ, 2 टीस्पून जिरं, 2 टीस्पून मोहोरी, 1 टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग पूड, 7-8 कढीपत्त्याची पानं..

कृती: प्रथम जाड बुडाच्या पसरट कढईत मध्यम आचेवर बाजरीचं पीठ कोरडच भाजून घ्यावं. दोन मिनिटात पिठाचा खमंग वास येईल. रंग बदलणार नाही. खमंग वास आला की पीठ एका ताटात काढून घ्यावं.

आता एकीकडे साधारण अर्धा लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवावं आणि दुसरीकडे कढईत तेल गरम होऊ द्यावं. गरम तेलात मोहोरी घालून ती तडतडली की बारिक चिरलेलं किंवा कुटलेलं आलं-लसूण एकत्र घालावं. लसणाचा उग्र वास जाऊन तो लालसर झाला की त्यात जिरं आणि हिंग घालावं. त्यावर कांदा घालून परतून घ्यावा. कांदा थोडा मऊ झाला की हिरवी मिरची, कढीपत्ता, व सिमला मिरची घालावी. त्यावर हळद व सैंधव घालून मिनिटभर परतून घ्यावे. 

आता त्यात भाजलेलं बाजरीचं पीठ घालून अर्धा मिनिट परतून नीट एकजीव करून घ्यावं. तोपर्यंत पाणी गरम झालेलं असेल. गरम पाणी काळजीपूर्वक कढईतल्या मिश्रणात हळूहळू ओतवं. मिश्रण नीट हलवत रहावं. सगळे पाणी घालून मिश्रण नीट एकजीव करावं आणि मंद आचेवर झाकण ठेवून पीठ चांगलं शिजू द्यावं. 

पाच मिनिटांनी झाकण काढून घ्यावं.त्यात चिंचेचा कोळ घालून घ्यावा. आता 2-3 मिनिटे तीव्र आचेवर उपमा परतून घ्यावा. परतत असताना कढईत उपम्याच्या सर्व बाजुंनी तूप सोडावं. उपमा कढई पासून सुटून त्याचा गोळा तयार होऊ लागेल. गॅस बंद करुन तयार झालेल्या बाजरीच्या उपम्यावर किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर नीट पसरवून घालावं आणि दोन मिनिटे झाकून ठेवावं.

आता हा गरमागरम बाजरीचा उपमा वाढल्यावर त्यावर थोडं तूप घालावं.

दिलेल्या प्रमाणात 3-4 जणांसाठी पुरेसा उपमा तयार होतो. हा बाजरीचा पौष्टिक उपमा नाश्ता म्हणून किंवा वन डिश मिल म्हणून खाऊ शकता.

तुम्हाला माहिती आहे का?

असेच छान चविष्ट पदार्थ खाऊनसुद्धा डायट करता येते आणि आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी होऊ शकते?


Share your love