साहित्य: पाऊण कप राजगिरा पीठ, पाव कप शिंगाडा पीठ, पाऊण कप मिल्क पावडर, पाव कप बारिक किसलेलं खोबरं, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून सोडा, 1 कप कोमट दूध, अर्धा कप तेल/पातळ तूप, 1 अंड (ऐच्छिक), 1 चिमूट मीठ, 10-12 काळे खजूर बारिक तुकडे केलेले, 10-12 काळ्या मनुका, 2 टेबलस्पून गुलकंद, कोणताही आवडता इसेन्स (ऐच्छिक)
कृती:
एका भांड्यात राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, मिल्क पावडर, बेकिंग पावडर, सोडा, मीठ हे कोरडे पदार्थ नीट एकत्र करून घ्यावेत. आता त्यात खजुराचे तुकडे, काळ्या मनुका घालाव्यात.
दुसऱ्या भांड्यात अंड फेटून त्यात दूध, तेल/तूप घालून नीट एकत्र करून घ्यावे. आवडत असल्यास आता त्यात इसेन्स ही घालू शकता. गुलकंद घालून हे मिश्रण नीट हलवून घ्या.
कुकरची शिट्टी आणि रिंग काढून ठेवा. कुकरमध्ये खाली जाळी ठेवून आजूबाजूला 2 टेबलस्पून मीठ टाका. केकचे बॅटर तयार होईपर्यंत, कुकरवर झाकण नुसते ठेवून कुकर 5 मिनिटे गरम होऊ द्या.
ज्या भांड्यात केक करायचा आहे त्याला सगळीकडून तूप लावून त्यावर थोडेसे पीठ भुरभुरून घ्या.
पिठाचे कोरडे मिश्रण दुधाच्या मिश्रणात घालून नीट एकजीव करून घ्या. तयार बॅटर भांड्यात ओतून घ्या.
केकचे भांडे कुकरमध्ये ठेवून कुकर बंद करा. 15 ते 20 मिनिटे मध्यम आचेवर केक बेक होऊ द्या.
केक शिजल्यावर गॅस बंद करून 5 मिनिटे केक कुकरमध्येच राहू द्या.
राजगिऱ्याचा पौष्टिक केक खाण्यासाठी तयार.
यात साखर घालण्याची आवश्यकता नाही. काळे खजूर, काळ्या मनुका, मिल्क पावडर व गुलकंद यांचा गोडवा अवीट गोडी आणतो.