कॅल्शियम कार्बाईडः स्वत:हून स्विकारलेला मृत्यू… भाग १ केळी


आतापर्यंत सर्वाना हे ठावूक झालेच असेल कि बाजारात विकायला आलेली केळी, आंबे आणि इतर काही फळे ही कॅल्शियम कार्बाईड द्रावणात बुडवलेली असतात. त्याचे दुष्परिणामही एव्हाना सगळ्यांना माहिती असतीलच की कॅल्शियम कार्बाइड हे कॅन्सरजनक असून मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. पण हे किती जणांना माहिती आहे की हा ग्राहकांनीच स्वतः ओढवून घेतलेला मृत्यू आहे?

केव्हाही अन्नपदार्थ व्यावसायिकांकडून केल्या जाणार्‍या घातक कृतींची आपल्याला माहिती मिळते, तेव्हा तेव्हा सामान्यपणे लोक अशा प्रकारे विचार करतात की हे व्यापारी-व्यावसायिक पैशासाठी हपापले आहेत म्हणून सार्वजनिक आरोग्यास धोक्यात टाकतात. परंतु कित्येक प्रकरणात जरा खोलात जाऊन शोध घेतला तर कळते की व्यापारी-व्यावसायिक जी घातक रसायने किंवा पद्धती वापरत आहेत त्याचा उगम ग्राहकांच्या फँटसीमध्ये, म्हणजेच स्वप्नरंजनात आहे. ग्राहकांनाच हवे म्हणून त्या पद्धती वापरण्यास व्यावसायिकांना हतबल केले जात आहे. इथे व्यावसायिकांची बाजू घेण्याचा प्रयत्न वाटेल परंतु हे सत्य आहे. सत्यास सामोरे जाणे तुमच्या आमच्या हिताचेच आहे. लेख शेवटपर्यंत नीट वाचावा.

कॅल्शियम कार्बाईड वापरले जाण्याचे एक मुख्य कारण काय तर केळ्याची साल ही एकही काळा तपकिरी ठिपका नसलेली चकचकीत अशी पिवळी असावी. अशी चकचकित पिवळीधम्मक साल असणे कोणाची गरज आहे? व्यापार्‍याची गरज नाही. कोणत्याही केळीवाल्याला विचारले तर हेच माहिती पडते की ठिपके पडलेली, काळसर तपकिरी झालेली अशी केळी ग्राहकांना नको असतात, त्यांच्यामते ती खराब, सडलेली असतात. ग्राहकांना पिवळीधम्मक साल असणारीच केळी हवी आहेत. हिरवीकच्ची किंवा नुकतीच पिकलेली, खाण्यास तयार असलेल्या ठिपकेदार केळ्यांना उठावच मिळत नाही. कारण सतत जाहिरातींमध्ये, चित्रांमध्ये पिवळीधम्मक साल असलेली केळी पाहून पाहून ग्राहकांची मानसिकता अशी झाली आहे की त्यांना इतर केळी ही कमअस्सल किंवा खराब वाटतात. जसे गोर्‍यापान आणि स्पॉटलेस त्वचेचे आकर्षण तसेच पिवळ्या आणि स्पॉटलेस केळ्याच्या सालीचे आकर्षण. परंतु ह्या आकर्षणाच्या हट्टापायी आपण साक्षात मृत्यूच पोटात घेत आहोत, आपल्या मुलांना विष खायला घालत आहोत हे कळत नाहीये. इथे दोन प्रकारे नुकसान होते आहे. एकतर विषारी रसायने पोटात जातातच, दुसरे असे की कार्बाईडमध्ये बुडवलेली केळी अर्धीकच्चीच असतात. ती लहानपणापासून तशीच खात आल्याने मुलांना खरोखर पिकलेली नैसर्गिक चवीची, नैसर्गिक साखर आणि गोडवा असलेली केळी कशी असतात हेच कधी कळणार नाही. पिकलेल्या केळ्यांपासून जो फायदा शरिराला व्हायला हवा तो पूर्णपणे होतच नाहीये. हे सर्व कशामुळे तर ग्राहकांना स्पॉटलेस पिवळी दिसणारी केळी हवी आहेत. बरे ही केळी काही दागिने करुन शरिरावर मिरवायचीही नसतात. मग हे वेड कशासाठी बाळगायचे?

केळी कशी दिसावी हे केळी विकणारे ठरवत नसतात. ग्राहक ठरवत असतात. जर आपल्याला कॅल्शियम कार्बाईडचा वापर थांबवायचा असेल तर ते वापरणार्‍या व्यावसायिकांवर छापे टाकून जप्ती करुन उपयोग होणार नाही. किंवा ऑर्गेनिकच्या नावाने मिळणारी स्पॉटलेस केळी घेऊन उपयोग नाही. अगदी सर्टीफाईड आणि ‘नो कॅल्शियम कार्बाईड’ असा शिक्का मिरवणारी केळीदेखील कार्बाईडच्या द्रावणात बुडवलेली आहेत हे स्पष्टपणे अनुभवी नजरेस दिसून येते. केळ्यांना नैसर्गिकरित्या पिकू देणे हेच सर्वांच्या हिताचे आहे. सर्वांच्या म्हणजे उत्पादकांपासून, व्यापार्‍यांपासून, थेट ग्राहकांपर्यंत सगळ्यांच्या हिताचे आहे.

ह्यावर उपाय असा आहे की ग्राहकांनी आपले स्पॉटलेस पिवळ्याधम्मक केळ्याचे वेड सोडून दिले पाहिजे. कार्बाईडमध्ये बुडवलेली पिवळीधम्मक केळी देठांजवळ हिरवट असतात, त्यांची साल पटकन निघत नाही, केळ आतून कच्चे असते. थोडे तपकीरी ठिपके पडत असलेली, नैसर्गिकपणे पिकल्याने मुग्ध करणारा सुगंध असणारी केळी आपल्या केळीवाल्याकडे मागा. त्यातही अशी गोम आहे की तपकरी पडत चाललेली केळी ठिपकेदार नसून ‘तपकीरी पॅचेस’ असलेली असल्यास ती कार्बाईडमध्ये बुडवलेली असतात. त्यामुळे शक्य असल्यास पिकायला तयार अशी कच्ची केळी विकत घ्या, घरी पिकवा, दोन दिवसांनी खा. ही पद्धत फारच सोपी, स्वस्त आणि महत्त्वाची म्हणजे आरोग्यास हितकारक आहे. सोबतच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे २ क्रमांकावर असलेले केळ विकत घेण्यास उत्तम तर ७ क्रमांकावर असलेले केळ खाण्यासाठी सर्वोत्तम समजले पाहिजे.ह्या भागात केळ्यांबद्दल सांगितले. पुढच्या भागात आंबा आणि टरबूज ह्या उन्हाळ्यानिमित्त खास फळांबद्दल जनहितकारक माहिती आमच्या बेटफास्ट लाइफस्टाइल पेजवर प्रसारित होणार आहे.

आरोग्यासंबंधीच्या अशाच अनोख्या व नवनविन परंतु वैज्ञानिक, वैद्यकिय सत्यावर आधारित माहितीसाठी आमचे फेसबुक पेज fb.com/BetterFast लाइक करा.

Share your love