No products in the cart.
होळी: तनामनाच्या आरोग्याचा सण
होळीचा सण भारतीयांसाठी दिवाळी किंवा पाडव्याइतकाच महत्त्वाचा आहे. आपल्या प्रत्येक सणाला धार्मिक, पारंपारिक कारणे असतातच परंतु ह्या सणांच्या मागे नैसर्गिक व मानवी व्यवहारांची सुद्धा कारणे आहेत. होळीच्या सणामागेही अशीच काही कारणे आहेत.
आजकाल होळीचा सण आला की बहुतांश भर हा रंग खेळणे ह्या कृतीवरच दिला जातो. जाहिराती, मालिका, लेख असो कींवा अगदी पर्यावरणवादी असो, सगळे केवळ रंग खेळणे ह्या गोष्टीभोवतीच फिरत असतात. परंतु होळीचे दोन महत्त्वपूर्ण भाग आहेत आणि हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत. एकाचा दुसर्याशी संबंध तुटला तर सण साजरे करण्याला अर्थ राहत नाही. काय आहेत हे दोन भाग?
पहिला भाग आहे तो सार्वजनिक स्वच्छतेचा. फाल्गुन महिन्यात थंडी संपत आलेली असते, वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. शिशिरात म्हणजे थंडीच्या काळात, पानगळीमुळे गावात बराच पालापाचोळा गोळा झालेला असतो. हा पालापाचोळा, घाण, कचरा गोळा करुन गाव स्वच्छ करुन तो सगळा कचरा पेटवुन द्यायची खूप जुनी परंपरा होती. वाळलेल्या झाडाच्या फांद्या, रानात सापडलेल्या, गावात पडलेल्या गोवर्याही गोळा करु त्यात टाकत असत. अशाने थंडीला निरोप देत आहोत असे समजले जात असे. रोगराईचे कारण असलेला हा पालापाचोळा, घाण वर्षातून दोन वेळा स्वच्छ करुन पेटवून दिली जाते, ती म्हणजे एकदा दसऱ्याला रावणदहनच्या निमित्ताने आणि दुसरी होळीच्या निमित्ताने.
अशा तर्हेने होळी हा सार्वजनिक आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने केला जाणारा सार्वजनिक स्वच्छतेचा उपक्रम आहे. पुढे तो उपक्रम काटेकोरपणे पाळला जावा म्हणून त्यास धर्माची जोड देण्यात आली.
त्यानंतर पाच दिवसांनी येते ती रंगपंचमी, भारतातल्या काही भागात होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. अर्थात कधीही रंग खेळण्याची प्रथा असली तरी हि प्रथा शेकडो वर्षे जुनी असल्याचे इतिहासतज्ञही सांगतात. कृष्ण आणि गोपिकांची रंग खेळण्याच्या प्रसंगांची वर्णने आपण अनेक कथा, कादंबऱ्या आणि कवितांमध्ये ऐकत आलो आहोत. अनेक भारतीय राजे महाराजे, सम्राट रंगोत्सव साजरा करण्यासाठी प्रसिद्ध होते. तर ह्या रंग खेळण्यामागे काही अर्थ होताच. तो होता मनाच्या स्वच्छतेचा.
वर्षभर आपण आपल्या आप्तमित्रांच्या संपर्कात असतो. काही व्यवहार, संवाद होतात. कधी कधी कटुता येते. कधी वयामुळे, नात्यांमुळे एक दुरावा असतो. हे सगळे किल्मिष मनातून निघून जावे, एकमेकांप्रती असलेला द्वेष निघून जावा, त्याचा निचरा व्हावा म्हणून रंग लावण्याची, रंग टाकण्याची प्रथा सुरु झाली. बऱ्याच ठिकाणी टोळक्याने एकमेकांच्या घरासमोर उभे राहून अर्वाच्य शिव्या द्यायची पद्धत आहे. एरवी ज्या नात्यांना वय-आदर ह्या नावाखाली दूर राहण्याचे संकेत पाळावे लागतात, ते या सणाच्या निमित्ताने एकमेकांच्या जवळ येऊन समानतेच्या अधिकाराने एकमेकांशी रंग खेळू शकतात. उच्चनीच स्त्री पुरुष असे भेद मिटवून सर्वांनी एकत्र आनंद घ्यावा म्हणून ह्या सणाची निर्मिती करणारा कोणी खुल्या मनाचा, मोकळ्या विचारांचा आपला पूर्वज असला पाहिजे.
तर आपण पाहिले की होळी हा सण केवल अंदाधुंद मजामस्तीचा नाही तर आपल्या परिसराची स्वच्छता आणि आपल्या मनाचे आरोग्यही जपणारा एक महान सण आहे. ह्या सणाला गेल्या काही वर्षात आलेले ओंगळवाणे स्वरुप घालवून हा सण त्याच मूळ संकल्पनेबरहुकूम साजरा करणे म्हणजे खर्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे पालन करणे समजले पाहिजे.
बेटरफास्ट परिवारातर्फे आपल्याला व आपल्या सर्व कुटूंबियांना सामाजिक समता, स्वच्छता आणि प्रेम ह्या मुल्यांची जाणीव करुन देणार्या होळीसणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!