वेट लॉस, वजन घटवणे, हेल्दी होणे काही आजचा ट्रेंड नाही, कित्येक दशकांपासून लोक अतिरिक्त वजन घटवण्यासाठी निरनिराळ्या कल्पना वापरत आले आहेत. बाजारात तर नेहमीच, ह्या ट्रेंडला पुरक, काही ना काही प्रॉड्क्ट येत असतात. यापैकी एका प्रॉडक्टची आपण आज जरा खोलात जाऊन माहिती घेऊया…
तर आजचा आपला खाद्यपदार्थ आहे मुसली, इंग्रजीत Muesli. किंवा Birchermüesli. ज्याला मराठीत आपण म्हणू शकतो ‘धान्य, सुकामेवा व फळांची भेळ’.
मुसली हा सन १९०० मध्ये शोधला गेलेला एक आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे. ह्याचे जनक स्वित्झर्लंडचे एक सुप्रसिद्ध डॉक्टर Maximilian Bircher-Benner हे आहेत. बरं हे काही साधेसुधे डॉक्टर नव्हते. रुग्णांच्या आरोग्याचा समूळ अभ्यास करुन त्यानुसार आहार हा उत्तम आरोग्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे हे त्यांचे मत त्याकाळात त्यांनी फार ठामपणे मांडले होते. त्या काळातही आहाराकडे आरोग्याच्या दृष्टीकोनातून फार लक्ष दिले जात नव्हते. त्यावेळी डॉ. मॅक्स यांनी असे मत मांडले की शिजवलेल्या खाद्यपदार्थांपेक्षा कच्च्या खाद्यपदार्थांत जास्त पोषणमूल्ये असतात कारण ह्या कच्च्या खाद्यपदार्थांतच सूर्यापासून थेट मिळणारी शक्ती संग्रहित असते जी प्रक्रिया केल्यानंतर कमी होत जाते. तेव्हा ज्या निरोगी लोकांना आपले आरोग्य टिकवायचे असेल त्यांनी आहारात किमान ५०% ह्या कच्च्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा व जे रोगी आहेत त्यांनी तर १००% कच्च्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे. त्या काळात त्यांच्या ह्या मतावर बरीच टिका झाली. डॉ. मॅक्स यांच्या कारकिर्दीबद्दल व त्यांच्या वैद्यकिय विश्वातल्या योगदानाबद्दल आपण दुसर्या लेखात सविस्तर चर्चा करु, तूर्तास मुसलीवर लक्ष देऊया.
तर डॉ. मॅक्स यांनी आपल्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांसाठी मुसलीची रेसीपी शोधली. ती मूळ रेसीपी अशी होती.
१. दोन किंवा तीन छोटी ताजी सफरचंदे साली व गरासकट.
२. सुकामेवा जसे की बदाम, अक्रोड, एक चमचा. रात्रभर पाण्यात भिजवलेला.
३. रोल्ड ओट्स. म्हणजे ओट्स रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याला दाबून सपाट करतात. साध्या भाषेत त्याला फ्लेक्स म्हणतात. मराठीत पोहे म्हणा. हे रोल्ड ओट्स म्हणजे ‘ओट्सचे’ पोहे तीन चमचे दूधात रात्रभर भिजवलेले.
४. अर्ध्या लिंबाचा रस.
५. दुधाची साय किंवा मध एक चमचा.
हे वरील सर्व पदार्थ एकत्र करुन ताजी ताजी भेळ बनवणे म्हणजे मुसली बनवणे व ब्रेकफास्टमध्ये खायला देणे. डॉ. मॅक्स यांच्या रुग्णांना ह्या मुसलीचा खूप फायदा झाला.
ही आहे खरी मुसलीची रेसीपी. ह्यात आपण वेगवेगळी फळे व सुकामेव्याचे कॉम्बीनेशन आवडीनुसार करु शकतो. बेसिक रेसीपी ताजी फळे, सुकामेवा व ओट्स ह्या पदार्थांची आहे. हे कोणीही घरच्या घरी बनवू शकतात. ह्यात फळे सोडून इतर घटकपदार्थ एकत्र करुन दुध घालून रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे व सकाळी खायच्या वेळी आवडीनुसार ताजी फळे कुस्करुन मिक्स करावीत. झाली खरी खुरी हेल्दी मुसली तयार!!!
आता आपण बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकेज्ड मुसलीबद्दल बघूया. बाजारात तयार मुसलीची पॅकेट्स बघितली व त्यांचे घटकपदार्थ बघितले, म्हणजे इंग्रीडिएन्ट्स (ingredients) तर बहुतांश प्रसिद्ध कंपन्यांच्या मुसलीपॅकेट्सच्या इंग्रीडियेंट्स मध्ये गव्हाचे प्रमाण जास्त आढळले आहे. साधारण ७० टक्के घटक हा गहू, मका, बार्ली अशा धान्यांचा बनलेला आहे. अवघे १८-२०% रोल्ड ओट्सचे फ्लेक्स आहेत, १०% सुकामेवा आहे. ह्याची सर्विंग साइझ म्हणजे वाढायचे प्रमाण, खायचे प्रमाण एकावेळेला तीन चमचे, साधारण ३० ग्रॅम आहे. या तीस ग्रॅम मुसलीला दूधात टाकून खायचे म्हणजे ‘ब्रेकफास्ट झाला’ असे समजावे असे ह्या पॅकेट्सवाल्यांचे म्हणणे आहे असे दिसते. तीस ग्रॅम तथाकथित मुसलीत २० ग्रॅम गहू व मका आहे, ३-४ ग्रॅम सुकामेवा आहे, आणि ६-७ ग्रॅम ओट्स आहेत. तुम्हीच विचार करा की मूळ रेसिपी च्या तुलनेत हे कितपत आरोग्यदायी असेल?
वर दिलेल्या फोटोंमध्ये काही प्रसिद्ध कंपन्यांच्या पॅकेट्सवरील घटकपदार्थ दर्शवलेले आहेत. यात काही घटकपदार्थ उत्तम प्रमाणात आहेत तर काही तसे नाहीत. फोटोंचा उद्देश केवळ तुम्हाला इंग्रीडियंट्स कुठे व कसे असतात हे समजावे यासाठी आहे. कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही प्रॉडक्टवर टीका करणे हा उद्देश नाही.
तर हे असे का होते ह्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कमर्शियल खाद्यपदार्थ बनवणार्या कंपन्या जनमानसात एखाद्या गोष्टीला पॉप्युलॅरिटी मिळेल असे मार्केटींग करतात. त्याला मूळ स्वरुपात वैज्ञानिक मान्यताही मिळत असते. जसे की मूळ मुसलीची रेसीपी कोणताही डॉक्टर सहसा रेकमेंड करेलच, त्यात वाईट काहीच नाही. आता ‘मुसली’ ह्या नावाला वैद्यकिय मान्यता मिळाली की कंपन्या त्या नावाचे खाद्यपदार्थ बाजारात आणायला सुरुवात करतात. हेवी मार्केटींग करतात. पण मूळ स्वरुपातली रेसिपी त्यांच्या एकूण प्रॉडक्शन ते विक्री ह्या व्यवस्थेशी जुळत नसते. कारण त्यात बर्याच समस्या असतात. पदार्थ खराब होणे हा त्यातला एक मोठा प्रश्न आहे. तेव्हा ते मूळ रेसीपीत आपल्या व्यवस्थेला अनुकूल असे बदल करतात. ते बदल ग्राहकाच्या आरोग्याला अनुकूल असतीलच असे नव्हे. खाद्यपदार्थाचे एखादे पॅकेट किमान दोन तीन महिने शेल्फवर राहणार आहेच असे गृहित धरुन तयार केलेले असते. त्यात त्यानुसार घटकपदार्थ टाकले जातात. म्हणजे मूळ रेसीपी चक्क बदललेली असते. पण सर्वसामान्य ग्राहकाला हे काहीच ठावूक नसते. त्याच्या लेखी तो कुठेतरी वाचतो की ‘मुसली हा खाद्यपदार्थ आरोग्यास चांगला आहे. ब्रेकफास्ट गरजेचा आहे,’ मग तो बाजारात, सुपरमार्केटमध्ये गेला की त्याला ते पॅकेट दिसतं आणि त्या लेखाच्या भरवंशावर, जिथे डॉक्टरांचा हवाला दिलेला असतो, तो खाद्यपदार्थ खायला सुरुवात करतो. बरेचदा हे खाद्यपदार्थ ब्लंट, पोषणमुल्यांच्या बाबतीत झिरो असतात. त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही, मोजता येत नाही. त्यामुळे ह्या खाद्यकंपन्यांचे केवळ प्रभावी मार्केटींगच्या भरवंशावर निभावून नेले जाते. जसे फेअर अॅन्ड लवलीमुळे एकही स्त्री काळ्याची गोरी झाल्याचे उदाहरण नाही पण कंपनी आजही त्याच क्षेत्रात नंबर वन पोजिशन ला आहे. तसेच या कंपनीमेड आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या बाबतीतही आहे.
ह्यात काळजी घेणे आपल्या हातात आहे. फसवणार्यांपेक्षा फसले जाणारे जास्त कारणीभूत असतात हे पक्के लक्षात ठेवावे. कुठलेही क्लेम पूर्ण व्यवस्थित माहिती झाल्याशिवाय मान्य करु नयेत. प्रत्येक खाद्यपदार्थांचे इंग्रिडियन्ट्स नीट तपासून पाहावे. जर एखादा खाद्यपदार्थ आरोग्यास चांगला आहे अशी कुठून माहिती मिळाली तर त्याबद्दल खोलात शोध घ्या, अथवा आम्हाला आमच्या पेजवर मेसेज टाका, आम्ही त्याबद्दल पूर्ण संशोधन करुन त्याची खरी माहिती व योग्य मार्गदर्शन आमच्या फेसबुक पेज व वेबसाईटवर प्रसिद्ध करु. मूळ पाककृती मिळाल्यास तीच वापरणे बाजारातल्या तयार रेसीपीपेक्षा जास्त फायद्याचे असते.
आजच्या दिवशी, मुसलीबद्दल इतकेच. मुसली आरोग्यास खरंच चांगली आहे. पण फक्त घरी बनवलेली. मुसलीची मूळ रेसीपी स्वतः घरीच बनवा.
आरोग्यासंबंधीच्या अशाच अनोख्या व नवनविन परंतु वैज्ञानिक, वैद्यकिय सत्यावर आधारित माहितीसाठी आमचे फेसबुक पेज fb.com/betterfast लाइक करा म्हणजे आपोआप तुम्हाला ही माहीत मिळत राहिल व तुमचे गैरसमज दूर होत राहतील.