साखर टाळा, आरोग्य सांभाळा

(डॉ. रॉबर्ट लस्टीग ह्या लढवय्या डॉक्टरच्या, ‘साखरेमुळे होणार्‍या लठ्ठपणा’विषयीच्या लेक्चर्सवर अंशतः आधारीत.)

शून्याचा शोध लावून सर्व जगावर उपकार करणार्‍या भारताचा आणखी एक असा शोध आहे जो सर्व जगावर अत्याचार करत आहे. साखर. हो साखरेचा शोध दोन हजार वर्षांपूर्वी आपल्याच भारतात लागला होता.  साधारण ८ हजार वर्षांआधी दक्षिण-पूर्व आशियात म्हणजे ब्रह्मदेश, थायलंड, मलेशिया, इत्यादी देश असलेल्या भागात उसाची लागवड व त्यापासून पिळून रस काढण्याचा शोध लागला होता. त्यानंतर त्या रसापासून खडीदार साखर बनवण्याची टेक्निक भारतीयांनी शोधून काढली. तेव्हापासून साखर मनुष्याजातीच्या जीभेवर राज्य करत आहे आणि त्याच्याच आरोग्याचा सत्यानाश. अर्थात साखरेच्या जागतिक आरोग्यावर अत्याचार करण्याच्या कारस्थानात आपल्या भारताचा  सहभाग नाहीये हेही खरेच.

तुम्ही म्हणाल, अरे हे काय बोलताय? आरोग्याचा सत्यानाश करत आहे तर मग राज्य कसे करत आहे? तीच तर गंमत आहे. एक जीवघेणी गंमत. ती राज्य करत आहे कारण ती व्यसनी बनवते. व्यसनी मनुष्याला ज्या गोष्टीचे व्यसन असते ती गोष्ट त्याच्या आयुष्यावर राज्यच तर करत असते. हळू हळू त्याला पोखरत जात असते. कोकेन, दारु, तंबाखू इत्यादींसारखा साखरसुद्धा एक व्यसन लावणारा पदार्थ आहे. फक्त त्याची झिंग चढून माणूस अद्वातद्वा बोलत नाही, नशेत बुडून समाजास अमान्य असे वर्तन करत नाही म्हणून साखरेचे व्यसन लक्षातच येत नाही. याच कारणामुळे साखरेच्या व्यसनाला कोणी व्यसन मानत नाही. अतिगोड खाणार्‍यांना ‘गोडघाशा’सारख्या विशेषणांनी लाडावले जाते. पण हे किती घातक आहे हे कुणाला कळतच नाही.

असे असेल तर आपल्या पूर्वजांनी साखरेचा शोध कशाला लावला असेल बरे? आपली प्राचीन जीवनपद्धती तर समृद्ध की काय अशी होती असे म्हणतात? मग हे कसे काय बुवा? तर फार जास्त प्राचीन काळात जायलाच नको. फक्त आपल्या आजी आजोबांना विचारा, त्यांच्या लहानपणी साखर खायचे ते किती आणि कधी. तर लक्षात येईल की ते फक्त सणासुदीला गोडधोड करुन खात असत. म्हणजे सणासुदीलाच साखरेचा वापर व्हायचा. याचे कारण काय असेल? साखरेचाच वापर जास्त का होतोय, तेही फक्त सणासुदीला?

त्याचे शास्त्रीय कारण म्हणजे गोड खाल्ल्याने मेंदूत डोपामाइन नावाचे हार्मोन स्त्रवतात. डोपामाइनमुळे एक आनंदी भावना निर्माण होते. छान छान वाटू लागते. आता याचे सामाजिक कारण असे आहे की सणासुदीला, समारंभाला, सामुहिक कार्याला उपस्थित असणार्‍यांमध्ये एक सामाइक अनुभूती, एकत्रितपणाची भावना असावी लागते. ती भावना येण्यासाठी मन उत्साही आणि शरीर उर्जेने सळसळत असले पाहिजे. तसेच समुहात सामील व्हायला अतिसूक्ष्म विचार करण्याची क्षमताही थोडावेळ बाजूला ठेवावी लागते. म्हणजेच थोडीशी गुंगी आवश्यक असतेच. आदिवासी समुहांच्या संस्कॄतीचा अभ्यास केलात तर असे लक्षात येईल की ते अशा प्रसंगात दारु चे सेवन करतात व त्यात लहान मुलांपासून, स्त्रिया-वृद्ध सगळेच सुरापान करत असतात. सुरापानाने वरील सर्व गोष्टी साध्य होतात. एका गुंगीच्या अंमलात उत्साही मनाने प्रसंग दणक्यात साजरा होतो. पण हेच सुरापान वाजवीपेक्षा जास्त झाले तर मात्र भलतेच प्रसंग ओढवतात. त्यामुळे आदिवासी संस्कृतीतून आधुनिक संस्कृतीकडे वाटचाल करतांना सुरापानाचे तोटे टाळून वरील गोष्टी साध्य करणारी साखर आधुनिक माणसाच्या हाती लागली असावी. वाजवी प्रमाणात गरजेपुरते डोपामाइन स्त्रवून हवा तो परिणाम मिळू लागला आणि सणासुदीच्या खाद्यपदार्थांमध्ये साखरेचे अनभिषिक्त राज्य प्रस्थापित झाले. पूर्वीच्या काळात साखर महाग असण्याचे व त्यामुळे फक्त सणासुदीलाच खाल्ली जाण्याचे कारण सांगितले जाते पण तो तर्क पटण्यासारखा नाही. कदाचित आपल्या पुर्वजांना साखरेचे दुष्परिणाम ठाऊक झाले असावेत.

कितीही साखर खा, दारूच्या अतिसेवनासारखे त्याचे दृश्य त्रासदायक परिणाम दिसून येत नाहीत मात्र किक अगदी व्यवस्थित हवी तितकीच बसते. तंबाखू वगैरे खाणार्‍यांना ह्या किकची माहिती असेलच. साखरेची किक तशी तंबाखूसारखी बसत नाही. ती हळूवार गारुड करते. जशी भांगेची गुंगी चढते. वैज्ञानिकांनी अनेक प्रयोगांतून हे सिद्ध केले आहे की साखर आणि कोकेन या दोहोंचेही मानवी मेंदूवर सारखेच परिणाम होतात. सततचा ड्र्ग्सचा मेंदूवर होणारा मारा मेंदूची स्वाभाविक रासायनिक प्रक्रिया बिघडवतो. तसेच काहीसे साखरेच्या सेवनाने होते.

साधारणपणे आपल्या शरिराला रोज जास्तीत जास्त एक ते दिड चमचा साखरेची गरज असते. तुम्ही म्हणाल अरेच्च्या! मी तर तेवढीच साखर चहात घेत असतो. म्हणजे माझे साखर खाणे योग्य प्रमाणातच आहे की? नाही हो. तुम्ही दिवसभरात सर्व खाद्यपदार्थांतून किमान वीस ते तीस चमचे साखर फस्त करत असता. विश्वास नाही बसत? आपल्या घरात ब्रेडवर जॅम लावून खात असाल तर एक चमचा जॅममध्ये तीन चमचे साखर असते. एक चमचा सॉसमध्ये दोन ते अडीच चमचे असते. हे तुम्ही स्वतः तपासुन पाहू शकता. ह्या पदार्थांच्या बॉक्सवर घटकपदार्थांच्या यादीत तुम्हाला पहिला पदार्थ दिसेल तो साखर. सगळे घटकपदार्थ नीट पहा. त्यात मूळ पदार्थाची, फळाची टक्केवारी किती आहे हे तपासा. टोमॅटो सॉसमध्ये २२ ते २७ टक्के टोमॅटोचा गर आहे असे दर्शवलेले असते. मग इतर ७८ ते ७३ टक्के काय असते? यातली साठ टक्के ‘साखर’ असते. अशाच प्रचंड प्रमाणात साखर सर्व प्रोसेस्ड फूड्मध्ये कोंबून कोंबून भरलेली असते. ह्या साखरेची नावे किती माहिती आहेत? ५६ नावे आहेत. हो, आपल्या साखरेला प्रोसेस्ड फुडमध्ये सुमारे ५६ नावांच्या मागे लपून घुसता येते. आजपासून बाजारात प्रोसेस्ड फूड विकत घेतांना घटकपदार्थ तपासून बघायची सवय लावाच. एक्स्पायरी सुद्धा पाहाच. ही सवय नेहमीच चांगली असते.

५६ नावांची साखर तर आहेच शिवाय गहू मैदा इत्यादींपासून बनवलेल्या पदार्थांचीही आपली अशी करामत आहे. बिस्कीट, ब्रेड सारखे सर्व बेकरी पदार्थ कॉन्सन्ट्रेटेड प्रकारात कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरात ओतत असतात. ह्या प्रकारच्या कार्बोहायड्रेट्सचेही शरीराला व्यसन लागते. एक बिस्किट खाऊन शांत बसवत नाही. अख्खा पॅक कधी गट्टम होतो ते कळत नाही. ह्याची पोटात गेल्यावर साखर म्हणजे ग्लुकोज होते.

ह्या जास्तीच्या ग्लुकोज/साखरेमुळे गरजेपेक्षा जास्त वजन वाढते. वाढलेल्या वजनामुळे अनेक प्रश्न निर्माण होतातच. तसेच ह्या शरीराला केवळ साखरेच्या उर्जेवर जगायची सवय लागते. आपल्या शरीरातली साठवलेली फॅटरुपी उर्जा वापरली जात नाहीच. आणि मग पोट सारखं भूक भूक करत राहतं. आपण सारखं येताजाता काहीतरी खात राहतो. शक्यतो हे अरबटचरबट, येताजाता खाणे प्रोसेस्ड फूड म्हणजे फॅक्टरीत तयार केलेले अन्नपदार्थच असतात. ज्यात परत भरपूर साखर+कार्बोहायड्रेट्स असतेच. त्यात फूडइन्डस्ट्रीचे स्वतःचे फायदे आहेत. साखर ही अ‍ॅडिक्टीव आहे. ती व्यसनी करते. नो वन कॅन इट जस्ट वन. तुम्ही एकदा खाऊ लागलात की परत परत त्याची तलफ येते. तलफ आली की तुम्ही विकत घेऊन हे पदार्थ खाता आणि फुडइन्डस्ट्रीचा फायदाच फायदा होतो.

आणि तुमचे कायमस्वरुपी नुकसान.

डायबेटीस, ओबेसिटी, हृदयविकार या सारख्या रोगांना कारणीभूत असणार्‍या साखरेच्या या भयानक राक्षसाचे खरे रुप समोर न येऊ देता फूड इन्डस्ट्री आणि मेडिकल इन्डस्ट्री दोन्हीही आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत. ह्यांच्या मालकांची बँक खाती फुगत आहेत आणि आपली हॉस्पिटलची बिलं फुगत आहेत.

साखरेच्या अतिसेवनामुळे शरिरात बदल घडत जातात. वजन तर वाढतेच पण उत्साह राहत नाही. काही व्यायाम किंव इतर शारिरीक कष्ट करायची इच्छा होत नाही. केवळ बसून राहून कामे करत राहावीशी वाटतात. अनेकांना आपले वाढते शरीर आवडत नाही, त्यासाठी ते व्यायामाचा कष्टपूर्वक मार्ग अवलंबतातही. पण शरीरासोबत मेंदूतही रासायनिक बदल घडून आल्यामुळे व्यायामाच्या रुटीनला आत्मसात करायला प्रचंड वेळ आणि प्रयत्न लागतात. हे असे होणे म्हणजे ‘आपल्यात कमिटमेंट नाही, डेडिकेशन नाही’ असे करणार्‍याला वाटते. इतर लोक अशा जाड झालेल्यांना ‘आळशी आहेस, तुझ्यात आग नाही, तू पेटून उठत नाही, प्रेरणा नाही’ असे टोमणे मारतात व ही लोकं सहनही करुन घेतात. त्यांना हे खरंच वाटतं. पण असं नसतं. तुम्ही रोज चार चार तास व्यायाम केला तरी वजन घटणारच याची शाश्वती नसते. याचे मुख्य कारण आपल्या जेवणात आहे. आपण खात असलेल्या साखरेत आहे. आपण खात असलेल्या प्रोसेस फूड मध्ये आहे.

या प्रोसेस्ड फूडच्या कारस्थानाचे बळी होऊ नका. आजपासूनच आपली जीवनशैली आमूलाग्र बदलण्याचा ‘पण’ करा. आणि हे फारच सहज आहे. ‘माझे साखरेशिवाय होतंच नाही, अमुकच नाही, तमुकच नाही’ असले कोणतेही कारण देऊ नका. साखर खाल्ली नाही तर कोणीही मरत नाही. मात्र खूप साखर खात राहाल तर मरण नक्कीच लवकर येईल आणि मधुमेह, हृदयविकार सारख्या जीवंतपणी नरक भोगायला लावणार्‍या रोगांसह येईल.

मग आता काय करावे म्हणता?

खाली दिलेल्यांपैकी सर्वच करा.

तुमचे वय, वजन, लिंग, भौगोलिक स्थान, जात, धर्म, इतिहास काहीही असू देत, आपल्या जेवणातून साखर कमी करा. लहान मुलांना तर जन्मल्यापासून साखरेपासून दूर ठेवा.

१. ताजी फळे, चिकू, सफरचंद, आंबा, उसाचा ताजा रस, केळी हे खा. यातली साखर इतर पोषक घटकांसोबत असते. त्यामुळे योग्य प्रमाणात साखर सेवन होते तसेच इतरही विटॅमिन्स शरीराला मिळतात.

२. बेकरी आयटेम्स जसे केक, बिस्किट्स, ब्रेड, पाव जे तुमच्या घरात बनत नाही, त्यातलं काही एक सुद्धा खाऊ नका.

३. मुलांना बॉर्नव्हिटा, कॉम्प्लॅन देत असाल तर बंद करा. नवजात बाळांना विकतची फॉर्मुला पावडर खाऊ घालत असाल तर बंद करा.

४. बाजारातले तयार फ्रूटजॅम, सॉस, स्प्रेड्स, केचप, कोल्ड्रींक्स, फ्रुट ज्यूस बंद करा. सगळ्यांत फक्त बेसुमार साखर असते. तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही इतकी.

५. पानीपुरी, समोसा, वडा, इत्यादी स्ट्रीट्स फूड आठवड्यातून फक्त एकदा खा.

६. ताज्या भाज्या, कच्च्या भाज्या नीट धुवून खाण्याचा सराव सुरु करा.

७. लोकल डेअरीचे फुल्ल क्रिम दूध आणा, त्यातून दही घरीच बनवा, ताक, लोणी, तूप घरीच बनवा. आपल्या घरगुती पद्धतीने तयार झालेले तूप लोणी कारखान्यातल्या प्रोसेसपेक्षा वेगळे असते.

८. Cold Press घाणीचे नारळाचे व शेंगदाणा तेल वापरा. रिफाइन्ड तेलाचा वापर बंद करा.

साखरेचा त्याग केल्यावर शरीरात व मनात चांगले बदल घडून येतील. सुरुवातीला कदाचित खूप क्रेव्हिंग होईल, डोकं दुखेल, मन अस्वस्थ, हूरहुर वाटायला लागेल. दारु, सिगरेट, ड्रग्स चा त्याग करतांना अशीच लक्षणं दिसतात. म्हणजे बघा आता काय ते..!

साखरेचे मेंदूवर व आपल्या वागण्यावर परिणाम विषद करणारे खालील विडियो बघा.

Share your love