इन्स्टंट डोसा, उत्तपा, ढोकळा वगैरे म्हंटलं कि त्यात हमखास खाण्याचा सोडा घातला जातो. पण वारंवार खाण्याचा सोडा घालून तयार केलेले पदार्थ खाणं हे आरोग्यासाठी चांगले नाही. आज आपण दही घालून चविष्ट उत्तपा तयार करणार आहोत.
साहित्य:
ज्वारीचं पिठ (१ कप),
तांदळाचं पिठ (अर्धा कप),
दही (अर्धा कप),
बारीक चिरलेला कांदा (अर्धा कप),
बारीक चिरलेली कोथिंबीर (अर्धा कप),
बारीक चिरलेली हिरवी मिरची (१ टेबलस्पून),
कुटलेला लसूण (१ टेबलस्पून),
कुटलेलं आलं (अर्धा टेबलस्पून),
धणे पूड (२ टीस्पून),
सैंधव (२ टीस्पून)
खडे मीठ (कुटून चवीप्रमाणे),
पाणी,
तेल.
कृती:
ज्वारीचं पिठ आणि तांदळाचं पिठ एकत्र करून थोडे पाणी घालून जरा ओलसर करून घ्या. त्यात दही घालून नीट कालवून घ्या. आता अजून थोडेसे पाणी घालून उत्तपे करता येतील असं सैलसर पिठ तयार करून घ्या. यात पिठाच्या गुठळ्या राहता काम नयेत. हे तयार मिश्रण १५ मिनिटे ते अर्धा तास झाकून ठेवा.
तोपर्यंत इतर तयारी करून घेता येईल. मिश्रण थोडावेळ मुरल्या नंतर त्यात कांदा. लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि धणेपूड घालून सगळं व्यवस्थित ढवळून घ्या.
तवा चांगला तापला कि त्यावर थोडंसं तेल घालून उत्तप्याचे मिश्रण गोलसर पसरवून घ्या. मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी उत्तपा चांगला सोनारी रंगावर खरपूस भाजून घ्या.
चटणी किंवा लोणच्या सोबत किंवा त्यांच्याशिवायही उत्तम लागतो हा उत्तपा.