मायेचेबोल  भाग 17

BetterFastPregnancyTips

रोज काय बरं नवीन करावं हा प्रश्न मनात घोळवंतच आज सकाळी भाजी आणायला गेले. तर भाजीवाल्या काकांनी आज मस्त कोवळे कोवळे दुधी भोपळे छान रचून ठेवलेले दिसले..

अगं मग काय, छान पैकी दोन कोवळे भोपळे घेतले. म्हंटलं आज होऊन जाऊदे झक्कास गोड काहीतरी.. 😉😉

बरं दुधी भोपळा म्हणजे तर पौष्टीक भाजी. त्यात त्याचा हलवा म्हणजे दुग्ध शर्करा योगचं.. अगदी अक्षरशः 😉😉

गरोदरपणात तर जरूर खावी. मग तुपण आज जरा गोडाची मज्जा घे..

शक्यतो साधारण दीड वीत वगैरे आकाराचा असा कोवळाच दुधी घे. दुधी एकदम कोवळा असेल तर साल नाही काढलंस तरी चालेल. फक्त वाहत्या नळाखाली व्यवस्थित चोळून धुवून घे स्वच्छ, म्हणजे झालं.

आता पहिले एक काम कर, एका छोट्या स्टील च्या पातेल्यात एक टेबल स्पून मिल्क पावडर घे त्यात जेमतेम एक छोटा चमचा पाणी घाल. मिल्क पावडर नीट कालवून घे. त्यात गुठळे किंवा कोरडी पावडर रहाता कामा नये. मस्त पेस्ट तयार झाली पाहिजे हं. आता कुकर मध्ये दोन वाट्या पाणी घालून हे पातेलं कुकर मध्ये ठेवं. फक्त एक शिट्टी झाली पाहिजे. मग लगेच गॅस बंद कर.

मिल्क पावडर कुकर मध्ये शिजत असताना एक चांगली जाड बुडाची कढई दोन टेबलस्पून शुद्ध तूप घालून जवळ तयार ठेवायची. आणि लगेच एकीकडे भोपळा किसायला घ्यायचा. भोपळा किसून होत आला की कढई गॅस वर ठेव म्हणजे त्यातलं तूप चांगलं तापेल. एकदा कढई चांगली तापली की नंतर गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा बरं. आता पटकन किसलेला भोपळा त्या तुपावर टाक. (किसलेला भोपळा धुवायचा नाही बरं. आणि पटकन यासाठी कढईत टाकायचा कारण तो लगेच काळा पडायला लागतो. म्हणून वेळ अजिबात वाया दवडायचा नाही. ☺) जरा दहा एक मिनिटं भोपळा चांगला परतून घे.

आता भोपळा बराचसा आळला असेल. त्यात एक टेबल स्पून दुधावरची साय (मलाई / फ्रेश क्रिम काय म्हणत असशील ते) घाल आणि साधारण अर्धी वाटी वगैरे दुध घाल. थोडेसे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घाल. सुकामेवा ऐच्छिक आहे पण घातलास तर फारंच उत्तम. हलवा अजून जरा पौष्टिक होईल गं. आणि त्यानिमित्ताने थोडा सुकामेवा खाल्ला पण जाईल.

तर आता भोपळा, दूध, साय सगळं नीट एकजीव झालं की झाकण ठेवून एक वाफ काढ. पुन्हा 2 मिनिटं चांगलं परतून घे. बरं अजून एक, साय आणि दुध नुकतंच फ्रिज मधून काढलेलं थंड घालायचं नाही. भोपळ्यात घालण्यापूर्वी ते किंचित कोमट करुन घ्यायचं.

आता त्यात साखर घाल. अंदाजे अर्धी वाटी साखर पुरेशी आहे. कारण दुध, साय आणि मिल्क पावडर यांचा पण गोडवा आहेच की..

साखर विरघळून नीट एकजीव झाली पाहिजे. आता हळूहळू हे सगळं मिश्रण कढईच्या कडांपासून सुटून गोळा तयार व्हायला लागेल. आणि थोडं तुप सुटायला लागेल. आता गॅस बंद करून कढई खाली उतरव.

आता त्यात थोडी वेलचीची पुड घाल. नीट एकत्र करून घे. आणि दोन मिनिटं झाकून ठेवं.

वेलची मुरेपर्यंत एकीकडे कुकर मधून मिल्कपावडर च पातेलं काढून घे. मिल्क पावडर घट्ट झालेली असेल. ती पातेल्यातंच नीट कुस्करून चांगली मोकळी करून घे. आता ही मिल्क पावडर दुधी हलव्यात घालून तो चांगला हलवून घे. ती हलव्यात नीट मिसळली गेली पाहिजे बरं. एकाच ठिकाणी गोळा होता कामा नये. अजून दोन मिनिटं हलवा झाकून ठेवं.

तर आता इतक्या सगळ्या मेहनती नंतर छान गोड गोड दुधी हलवा तयार आहे माझ्या लाडक्या पोटुशीची रसना तृप्त करण्यासाठी… ☺☺

–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in

Share your love