BetterFastPregnancyTips
वाssह सुंsदर..खरंच, काय ऐकत होतीस गं..खिळवुन ठेवलं त्या सुरांनी मला..खुप प्रसन्न वाटलं..
तु इतकं छान आल्हाददायक संगीत ऐकत आहेस हे पाहुन आनंदही झाला. संगीत हे नेहमीच मनाला उल्हासित करतं. कोणत्याही वयात ते आनंदच देतं. त्यात गरोदरपणी तर उत्तम संगीत म्हणजे विरंगुळ्या सोबत पोषक घटकही. म्हणून तुला जी आवडतील ती गाणी, वाद्य, संगीत नेहमी ऐकत जा.
संगीता सोबतच थोडंफार वाचनही करत जा. चांगली सकारात्मक पुस्तकं, महान व्यक्तींची चरित्र, हलक्या फुलक्या कथा कादंबऱ्या, बोधकथा, कविता वगैरे जे तुला आवडेल ते नक्की वाच. अगदी फास्टर फेणे किंवा बोक्या सातबंडे, चंपक, ठक ठक असं काही वाचावं वाटलं तरी चालेल. बिनधास्त वाच. तुझ्या शरीराबरोबरच मनालाही उत्तम खाद्य मिळायला हवं ना. 😉
तसं टीव्ही पहायला ही हरकत नाही. पण त्यासाठी तुझ्या दैनंदिनीत शक्यतो कमी वेळ ठेव.
संगीत, वाचन, टीव्ही, सोशल मीडिया, इंटरनेट यातल्या कोणत्याही गोष्टीनी तुझ्या मनावर ताण येता कामा नये. तुला भीती वाटेल, घाबरशील, खुप दुःख होईल, उदास वाटेल, अस्वस्थ वाटेल, गोंगाट वाटेल अशा गोष्टी टाळ. त्या तुझ्या सध्याच्या थोड्याशा नाजूक अवस्थेमध्ये त्रासदायक ठरू शकतात.
सगळं अगदी गोड गोड, बाळबोध असावं असं नाही म्हणायचंय मला पण जे असेल ते तुझ्या साठी सुखद अनुभव असावं. तुला प्रसन्न वाटेल असं असावं इतकंच..
तुझ्या मनात निर्माण होणाऱ्या भावना.. त्याचे तुझ्या तब्येतीवर आणि बाळाच्या जडणघडणीवर उमटणारे पडसाद .. हे सगळं एकमेकात गुंफलेलं आहे.. म्हणुन तुझी पंचेंद्रिय काय ग्रहण करतात, काय अनुभवतात यावर ‘आई’ म्हणून तुलाच नियंत्रण ठेवायचंय. 👍
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in