साहित्य:
४ टेबल स्पून तूर डाळ, ४ टेबल स्पून हिरवी सालीची मूग डाळ, २ टेबल स्पून मसूर डाळ, २ टेबल स्पून चणा डाळ, २ टेबल स्पून काळी सालीची उदित डाळ, २ टेबल स्पून मठाची डाळ, पाऊण कप तांदूळ, १ टीस्पून मेथी दाणे, पालकाची एक पूर्ण जुडी, ७-८ हिरव्या मिरच्या, १०-१२ पानं कढीपत्ता, १ अख्खा मोठा लसूण, १ इंच आलं, २ टीस्पून जिरे, ८-१० काळी मिरी, १ इंच दालचिनी, १ कप बारीक चिरलेला कांदा, एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून हळद, १ टीस्पून हिंग, २ टीस्पून सैंधव, चवीपुरते जाडे मीठ.
कृती:
प्रथम एका भांड्यात सगळ्या सहा डाळी एकत्र करून धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या भांड्यात तांदूळ धुवून त्यातच मेथी दाणे घाला व तेही रात्रभर भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी आधी तांदूळ मेथीदाणे बारीक रवाळ वाटून घ्या. शक्यतो वाटताना पाणी घालू नका. नंतर डाळी वाटून घ्या. डाळी वाटण्यासाठी डाळी व तांदूळ भिजवायला वापरलेले पाणीच घ्या. डाळी सुद्धा बारीक पण थोड्या रवाळ वाटून घ्या. डाळी वाटताना त्यातच पालक, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आलं, लसूण, जिरं, दालचिनी, काळी मिरी हे सगळं पण घाला.
एका मोठ्या भांड्यात वाटून झालेले तांदूळ व डाळी एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, हिंग, सैंधव आणि मीठ घाला. आता हे मिश्रण नीट हलवून घ्या. अगदी फेटल्यासारखे चांगले हलवावे त्यामुळे धीरड्याला छान जाळी येते.
आता एकीकडे तवा तापत ठेवा. तापलेल्या तव्यावर थोडे तेल टाकून डावाने (वरण वाढायचा मोठा गोलाकार चमचा) मिश्रण घाला. डावानेच ते मिश्रण गोलाकार पसरवून घ्या. धीरड्याच्या सगळ्या बाजुंनी अगदी थोडे तेल सोडा. आता त्यावर झाकण ठेवा. थोड्यावेळेने झाकण काढून धिरडे पलटून घ्या. दोन्ही बाजूने लालसर सोनेरी भाजून घ्या.
हे धिरडे दही, लोणचे, एखादी चटणी किंवा सॉस सोबत खूप छान लागते.
या दिलेल्या प्रमाणात साधारण १३-१४ मध्यम आकाराची धिरडी होतात. ५-६ व्यक्तींसाठी अगदी पोटभरीची न्याहारी होते.