वाटली डाळ

साहित्य:
अर्धा कप चणा डाळ, पाव कप मूग डाळ, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, ७-८ लसूण पाकळ्या, ४ टीस्पून जिरं, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, पाव कप तेल, १ टीस्पून मोहोरी, १ टीस्पून हिंग, ७-८ कढीपत्त्याची पानं, १ टीस्पून हळद, १ टीस्पून सैंधव, बारीक कुटलेले जाडे मीठ चवीनुसार, १/३ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध लिंबू, पाव कप खोवलेलं ओलं खोबरं (ऐच्छिक)

कृती:
चणा डाळ व मूग डाळ एकत्र करून धुवून घ्या. पुरेसे पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा.

सकाळी पाणी न घालता डाळी जाडसर वाटून घ्या. डाळी वाटतानाच त्यात हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि २ टीस्पून जिरं घाला. (उरलेलं २ टीस्पून जिरं फोडणीत घालायचं आहे.)

आता हे जाडसर वाटलेलं डाळीचं मिश्रण एका स्टीलच्या डब्यात भरून झाकण बंद करा.

कुकरमध्ये पाणी घालून हा मिश्रणाचा बंद डबा कुकरमध्ये ठेवा. एक शिट्टी झाली की गॅस बंद करा. वाफ बसली की कुकर उघडून डब्यातले डाळीचे मिश्रण मोकळे करून घ्या.

जाड बुडाच्या कढईत तेल तापलं की मोहोरी घाला. मोहोरी तडतडली की जिरं, हिंग, कढीपत्त्याची पानं घाला. आता कांदा घालून चांगला परतवून घ्या. कांदा मऊ झाला की हळद, सैंधव आणि मीठ घालून परतवून घ्या.

ह्यात आता उकडलेल्या डाळीचे मिश्रण घालून नीट परतवून घ्या. आच मंद करून झाकण ठेवा. एक वाफ आली की झाकण काढून सतत परतत रहा. डाळ चांगली कोरडी होई पर्यंत परतवून घ्या. उपम्यासारखी ओलसर नको रहायला. चांगली कोरडी झाली पाहिजे.

गॅस बंद करून, लिंबू पिळून डाळ नीट हलवून घ्या. वरून कोथिंबीर घाला. आवडत असल्यास खोवलेलं ओलं खोबरंही घालू शकता.

वाटली डाळ करण्यासाठी जाड बुडाची कढईच घ्यावी कारण डाळ बुडाला चिकटतेच. थोडीशी चिकटून खरपूस झाली तर छानच लागते पण जास्त करपून जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी.

वर दिलेल्या प्रमाणात साधारण २-३ जणांसाठी पुरेशी डाळ होते.

खास टीप:- मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेली डाळ कुकरमध्ये उकडून घेतल्याने नंतर फोडणीत ती पटकन कोरडी होते. त्यामुळे करपण्याची शक्यता कमी होते. डाळ कढईत शिजवायला लागणारा वेळ वाचतो.

अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी वाटली डाळ लहानांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.

वेटलॉस प्रोग्राम्समध्ये फक्त खूप पैसे खर्च होतात असे तुम्हाला वाटत असेल तर थांबा. तुमचे हजारो रुपये वाचवणारा बेटरफास्ट प्रोग्राम तुम्हाला माहिती आहे का? इथे क्लिक करा:

अशाच हेल्दी फूड टिप्स, रेसीपीसाठी Like करा Betterfast Lifestyle चे Facebook page: fb.com/betterfast
© BetterFAST Lifestyle Consultancy, Nashik.
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action

Share your love