साहित्य:
अर्धा कप बारिक चिरलेले गाजर , पाऊण कप उभा चिरलेला कांदा, अर्धा कप उभी बारिक चिरलेली सिमला मिरची, पाऊण कप बारिक चिरलेला फ्लॉवर, अर्धा कप बारिक गोलाकार चिरलेली फरसबी, पाव कप बारिक चिरलेली कोथिंबीर, 4-5 मोठ्या लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून लाल मिरची पूड, सैंधव, 1 टेबलस्पून काळी मिरी पूड, तेल, बटर
चिकन मॅरीनेट करण्यासाठी साहित्य:
350 ते 400 ग्रॅम बोनलेस चिकन, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, एक टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून हळद, सैंधव, 3-4 मोठ्या लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा
पूर्वतयारी:
सर्व प्रथम बोनलेस चिकन स्वच्छ धुवून त्याचे अर्धा-एक इंच आकाराचे लहान तुकडे करून घ्यावेत. मॅरीनेशनसाठी 3-4 लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा एकत्र बारिक कुटून घ्यावा.
ही आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पूड, सैंधव आणि लिंबाचा रस हे सगळं साहित्य चिकनला नीट चोळून लावावे. आता हे चिकन 15 मिनिटे ते ३० मिनिटे झाकून ठेवावे. तोपर्यंत इतर भाज्या कापून तयार ठेवता येतील.
कृती:
सगळी पूर्व तयारी झाल्यानंतर एका जाड बुडाच्या भांड्यात/कढईत 1 टेबलस्पून तेल घालावे. तेल तापले की त्यात मॅरीनेटेड चिकन व चिकनला सुटलेले पाणी घालून झाकण ठेवावे. मंद आचेवर 10 मिनिटे चिकन शिजू द्यावे.
आता 4-5 लसूण पाकळ्या, आलं आणि हिरव्या मिरच्या या तीन गोष्टी एकत्र जाडसर कुटून घ्याव्यात. एकीकडे चिकन शिजत असताना दुसरीकडे अजून एक पसरट कढई तापत ठेवावी. त्यात 2 टेबलस्पून बटर आणि 2 टेबलस्पून तेल घालावे.
तापलेल्या तेलात लसूण-आलं-हिरवी मिरची हे वाटण घालून मध्यम आचेवर परतून घ्यावे. आलं-लसणाचा उग्र वास कमी झाल्यावर त्यात गाजर घालून 2-3 मिनिटे परतून घ्यावे. आता तीव्र आचेवर त्यात कांदा घालून तो थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा.
कांदा परतून झाल्यावर त्यात उरलेल्या भाज्या म्हणजे फरसबी, फ्लॉवर आणि सिमला मिरचीचे तुकडे घालावेत. सैंधव व लाल मिरची पूड घालून भाज्या 2-3 मिनिटे परतून घ्याव्यात.
आता चिकन शिजले असेल. चिकनचे तुकडे या भाज्यांमध्ये घालून घ्यावेत. चिकन शिजत असताना त्याला सुटलेले पाणी वेगळे ठेवावे. ते भाज्यांमध्ये घालू नये.
काळी मिरी पूड घालून 2-3 मिनिटे तीव्र आचेवर चिकन सगळ्या भाज्यांसोबत परतत राहावे.
गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी. गरमागरम स्टर फ्राय व्हेजिज विथ चिकन खाण्यासाठी तयार.
वर दिलेले प्रमाण साधारण 3 ते 4 व्यक्तींसाठी पुरेसे होते. वन डिश मिल म्हणून हा पदार्थ खाऊ शकता. तसेच साईड डिश म्हणून ही करू शकता.
एक्स्ट्रा टीप: चिकन शिजवताना सुटलेले पाणी जे आपण बाजूला काढून ठेवले होते त्यात सैंधव, बटर व कोथिंबीर घालून ते सूप म्हणून पिऊ शकता.
अशाच हेल्दी फूड टिप्स, रेसीपीसाठी Like करा Betterfast Lifestyle चे Facebook page: fb.com/betterfast
© BetterFAST Lifestyle Consultancy, Nashik.
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action)