साहित्य:
अडीच वाटी तांदूळ, ६ अंडी, २ मोठे कांदे उभे पातळ काप करून, २ मोठे टोमॅटो बारीक चिरलेले, १ गाजर बारीक चिरलेले, अर्धा कप कोबी लांब काप केलेला, ४-५ हिरव्या मिरच्या, १०-१२ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, अर्धा कप कोथिंबीर, ३-४ लाल सुक्या मिरच्या, १ मसाला वेलची, १ बाद्यान (चक्रीफूल), २ लवंगा, २ टीस्पून जिरं, १ टीस्पून धणे, ७-८ काळी मिरी, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ तमालपत्र, ७-८ मेथी दाणे, १ टीस्पून हिंग, १ टीस्पून हळद, १ टीस्पून लाल मिरची पूड, २ टीस्पून सैंधव, जाडे मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून बटर किंवा तूप.
पूर्वतयारी: तांदूळ धुवून पाण्यात भिजत ठेवावेत. १५ मिनिटांनी ते उपसून ठेवा. ३ अंडी उकडून घ्या.
लाल सुक्या मिरच्या, मसाला वेलची, बाद्यान (चक्रीफूल), लवंगा, १ टीस्पून जिरं, धणे, काळी मिरी, दालचिनी हे खडे मसाले कोरडे भाजून कोरडेच बारीक वाटून घ्यावेत.
हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण एकत्र वाटून घ्या.
कृती: जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत बटर/तूप गरम करा. त्यात १ टीस्पून जिरं, हिंग, तमालपत्र, मेथी दाणे आणि कांदा घाला. कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या. त्यात हिरव्या मिरचीचे वाटण घालून आलं लसणाचा उग्र वास जाईपर्यंत परतून घ्या. टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता. दुसरीकडे तांदळाच्या दुप्पट पाणी (५ वाट्या) गरम करायला ठेवा.
आता परतलेल्या टोमॅटो – कांद्यात वाटलेली मसाल्याची पूड, हळद, लाल मिरची पूड, सैंधव आणि जाडे मीठ घालून सगळं मिश्रण नीट हलवून घ्या. उरलेली तीन अंडी फोडून फेटून घ्या. फेटलेली अंडी घालून मिश्रण नीट हलवून घ्या.
आता त्यात तांदूळ घालून, ते मसाल्यात थोडे परतून घ्या. तोपर्यंत पाणी तापलेलं असेल, ते तांदळात घाला. नीट हलवून झाकण ठेवा व मध्यम आचेवर शिजू द्या.
५ मिनिटांनी त्यात उकडलेली ३ अंडी घालून पुन्हा नीट हलवून घेऊन झाकण ठेवा. मंद आचेवर १० मिनिटे शिजू द्या.
१० मिनिटे होण्याच्या जरा आधी कोबी घालून हलकेच वरच्यावर हलवून घ्या.
१० मिनिटं पूर्ण झाली की गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला आणि ५ मिनिटे झाकून ठेवा.
वर दिलेल्या प्रमाणात साधारणपणे ३-४ जणांना पुरेल इतका भात तयार होतो.
या भाता सोबत तोंडी लावायला एखादे रायते नक्की असावे.
अशाच हेल्दी फूड टिप्स, रेसीपीसाठी Like करा Betterfast Lifestyle चे Facebook page: https://www.facebook.com/BetterFast
© BetterFAST Lifestyle Consultancy, India.
www.betterfast.in
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action)