हेल्दी उतप्पा

शाळा तर बंद आहेत, पण मुलांना खायला सतत काही न काही दिवसभरात लागत असतेच. मुलांना आवडेल आणि पौष्टिक असेल असे दुहेरी फायदे हवे असल्यास ही रेसिपी ट्राय करा. कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.

लागणारे साहित्य:

चणा डाळ (अर्धा कप)
काळी उडदाची डाळ(अर्धा कप) ,
हिरव्या सालीची मूग डाळ (अर्धा कप),
तुरीची डाळ (पाव कप),
मसुराची डाळ (पाव कप),
तांदूळ (दोन कप),
मेथी दाणे (१५-२०),
बारीक चिरलेला कांदा (दोन कप),
बारीक चिरलेला टोमॅटो (दोन कप),
बारीक चिरलेली कोथिंबीर (१ कप),
हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या (४-५ )
कढीपत्त्याची पानं (१०-१२ अगदी बारीक चिरलेली)
सैंधव ( ७ टीस्पून ),
बारीक कुटलेले जाडे मीठ,
तेल.

कृती: सगळ्या डाळी धुवून एकत्र भिजत ठेवा. त्यात मेथीदाणे पण भिजू घाला. तांदूळ वेगळे भिजत ठेवा. ४-५ तासांनी रवाळ वाटून घ्या. वाटलेले डाळ – तांदूळ एकत्र करून मिश्रण नीट हलवून उबदार जागी झाकून ठेवा.

उन्हाळ्यात हे मिश्रण ८ तासांत आंबते. थंडीच्या दिवसांत १२ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे ह्याचा विचार करून त्याप्रमाणे डाळी भिजत घालाव्यात व वाटाव्यात.

मिश्रण आंबले की ते व्यवस्थित हलवून घ्यावे. त्यातले गरजेपुरते एका लहान भांड्यात काढून त्यात सैंधव, मीठ आणि थोडेसे पाणी घालून फेटल्यासारखे हलवून घ्यावे. यामुळे छान जाळी पडते.

कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं हे सगळं एका भांड्यात एकत्र करून ठेवा.

आता तवा तापत ठेवा. त्यावर अगदी थोडे तेल घाला. एक ते २ डाव मिश्रण डावाने तव्यावर ओता. (डाव म्हणजे वरण वाढण्याचा मोठा गोलाकार खोलगट चमचा/पळी) मिश्रण नीट गोलाकार पसरवून घ्या. त्यावर कांदा-टोमॅटो घाला. त्याच्या सर्व बाजूनी थोडेसे तेल घाला आणि झाकण ठेवा.

थोड्यावेळात झाकण काढून उत्तप्पा पलटवून घ्या. पुन्हा झाकण ठेवा. काही सेकंदातच दुसरी बाजूही भाजून होईल. कांदा-टोमॅटो थोडे खरपूस होतील. तयार झालेला उतप्पा तव्यावरून उतरवून घ्या.

खोबऱ्याच्या किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत हे उतप्पे छान लागतात.

© BetterFAST Lifestyle Consultancy, Nashik.
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action)

Share your love