
साहित्य:
2 वाट्या मुगाची डाळ पिवळी, पाऊण वाटी तांदूळ, 12-15 मेथी दाणे, 1 कप बारिक चिरलेला कांदा, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पानं, 1 कप कोथिंबीर कोवळ्या देठांसह, 1 टेबलस्पून जिरं, सैंधव, तेल.
कृती:
मुगाची डाळ आणि तांदूळ 4 ते 5 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत. मेथी दाणे तांदुळातच भिजू घालावेत.
कमी पाणी वापरून भिजलेले डाळ-तांदूळ अगदी बारिक वाटून घ्यावे. वाटत असतानाच त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, सैंधव हे सर्व साहित्य घालून घ्यावे. वाटलेल्या मिश्रणात पुरेसे पाणी व कांदा घालून मिश्रण नीट हलवून घ्यावे. डोसे करता येतील इतपत पातळ मिश्रण तयार करावे.
डोश्याच्या तव्यावर थोडेसे तेल पसरवून ते चांगले तापू द्यावे. आता त्यावर एक वाटी मिश्रण ओतून ते वाटीने गोलसर पसरवून घ्यावे.
डोशाची वरची बाजू कोरडी झाली की डोसा पलटावा. दुसऱ्या बाजूनेही नीट भाजून घ्यावा. गरमागरम मूग डाळ डोसा खाण्यासाठी तयार.

कोणत्याही चटणीबरोबर हे डोसे खाऊ शकता. दिलेल्या प्रमाणात 3 ते 4 जणांसाठी पुरेसे डोसे तयार होतात.