माणसांच्या उंचीचा आहाराशी संबंध.
आपले पूर्वज सात फूट उंच होते, दहा फूट उंच होते आणि दोनशे वर्षे जगायचे, दोनशे किलो वजनाचे त्यांचे शरीर असे, एका बैठकीत पंचवीस भाकऱ्या खात असत आणि तीनशे किलोची हत्यारे घेऊन ते लढाई करत असत असा मनोरंजक कल्पनाविलास आपण नेहमीच ऐकत वाचत असतो…पण सत्य काय आहे?
मागच्या दीडशे वर्षांत मानवी उंचीच्या संदर्भात केलेल्या निरीक्षणानुसार असं लक्षात आले आहे की वेगवेगळ्या देशातील सरासरी उंचीमध्ये वाढ झाली आहे.
ह्यात युरोपियन राष्ट्रें विशेषतः उत्तर युरोपियन राष्ट्रे अधिक पुढे आहेत. तिथल्या पुरुषांच्या उचीत सरासरी 13 सेंटीमीटर इतकी वाढ गेल्या दिडशे वर्षात दिसून आली आहे. म्हणजे आज विशीत असलेल्या एखाद्या व्यक्तीची उंची समजा 180 सेंटिमीटर असेल तर तिच्या आधीच्या सातव्या पिढीतील पूर्वजाची उंची 167 सेंटीमीटर असेल. हा फरक समजून घेण्यासाठी आपण शाळेत आपल्या कंपास मध्ये 15 सेंटीमीटर ची फुटपट्टी वापरत होतो ती आठवू शकतो. पाच इंचापेक्षा थोडी जास्त,
हा फरक कशामुळे आलाय? हा फरक उत्क्रांती मुळे आलेला नाही. कारण उत्क्रांती चा मोजण्यासारखा फरक दिसायला कदाचित लाखो पिढया लागतील.
ह्याचं कारण आनुवंशिक गुणसूत्रांमध्ये देखील नाही. तुमचे आईवडील किंवा आजीआजोबा किती उंच होते ह्यावरून तुम्ही किती ऊंच होऊ शकता हे ठरत नाही.
सरासरी उंची वाढण्याचं कारण आहारात आहे. ज्या ज्या ठिकाणी, देशामध्ये पोषक आहार आणि उत्तम जीवनशैली विकसित झाल्या, सामान्य माणसाला चांगल्या दर्जाचे खाणं पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालं, त्याचं आयुष्य सुखकर झाले, जीवनाचा दर्जा वाढला तिथल्या सरासरी उंचीमध्ये जास्तीत जास्त वाढ झालेली दिसून येते आहे.
उंचीच्या वाढीच्या बाबतीत डच नागरिक जगात बरेच पुढे असले तरी साऊथ कोरियन स्त्रियांची सरासरी उंची 20 सेंटीमीटर ने वाढली आहे, ही जगातील सर्वात जास्त वाढ आहे. म्हणजे जवळपास आठ इंच, अर्ध्या फुटापेक्षा जास्त….
त्याचवेळी मादागास्कर येथील स्त्रियांची उंची फक्त 1.5 सेंटीमीटर ने वाढलेली दिसून येते.
अन्नातून मिळणारे पोषण, जीवनाचा दर्जा मानवी विकासावर किती परिणाम करू शकतो हे यावरून लक्षात येते.
मागच्या शंभर वर्षांत भारतीय पुरुषांची उंची सरासरी 2.9 सेंटीमीटर ने वाढली आहे.तर स्त्रियांची 4.9 सेंटीमीटर ने वाढली आहे. ही फारशी अभिमानास्पद वाढ नाहीये.
आपण आपल्या राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक प्राथमिकता ठरवताना आहार, जीवनशैली ह्यांना किती प्राधान्य देतोय ते आपल्या देशातल्या सरासरी उंचीच्या वाढीवरून दिसुन येतं…
~ संदीप डांगे