साहित्य: 4 मध्यम आकाराची पिकलेली केळी, 3 अंडी, 2 टीस्पून वेलची पूड, अर्धा कप नाचणीचे/तांदळाचे पीठ, तेल/बटर
ऐच्छिक साहित्य: 1 टेबलस्पून किसलेले डार्क चॉकलेट, 2 टीस्पून कोको पावडर,1 टेबलस्पून मिल्क पावडर
कृती: एका भांड्यात अंडी नीट फेटून घ्या व त्यात नाचणीचे/तांदळाचे पीठ कालवून घ्या. दुसऱ्या भांड्यात सालं काढलेली केळी कुस्करून घ्या. त्यात वेलची पूड, मिल्क पावडर, डार्क चॉकलेट, कोको पावडर घालून नीट एकत्र करून घ्या.
आता या केळ्याच्या मिश्रणात फेटलेली अंडी व पीठाचे मिश्रण घालून सगळे चांगले फेटून घ्या.
तवा तापला की त्यावर थोडेसे तेल घालून पॅनकेकचे मिश्रण पसरवून घ्या. पॅनकेक हे पुरी पेक्षा आकाराने थोडेसे मोठे आणि उत्तप्यासारखे जाडसर असतात. त्यामुळे मिश्रण फार जास्त पसरवून पॅनकेक पातळ करण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास उलटताना तुकडे होऊ शकता.
पॅनकेकवर झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्या. एक बाजू शिजली की उलटून घ्या. पुन्हा झाकण ठेवा. दोन्ही बाजूनी नीट शिजले की पॅनकेक तयार आहेत न्याहारीसाठी.
वर दिलेल्या प्रमाणात ४ किंवा ५ पॅनकेक होतात जे दोन जणांसाठी पुरेसे आहेत.
डार्क चॉकलेट व कोको पावडर घातल्यास लहान मुलं अतिशय आवडीने खातात.