साहित्य:
पाव किलो पनीर, 1 कप उभा चिरलेला कांदा, 1 कप उभी चिरलेली सिमला मिरची, 1 कप लांबट गोल चिरलेली फरसबी, 1 कप बारिक लांब चिरलेला कोबी, 8-10 लसूण पाकळ्या, दीड इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून जिरे पूड, 1 टेबलस्पून काळी मिरी पूड, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून कसुरी मेथी (ऐच्छिक), तेल, सैंधव, 2 कोळसे (ऐच्छिक) व 1 टेबलस्पून तूप
कृती:
सर्व प्रथम एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. पाणी उकळेपर्यंत पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्यावे.
पाणी उकळले की गॅस बंद करून पनीरचे तुकडे त्या पाण्यात 5-10 मिनिटं घालून ठेवावेत.
पनीर मॅरीनेट करण्यासाठी एक इंच आलं आणि 4-5 लसूण पाकळ्या एकत्र कुटून घ्याव्यात.
भाज्यांमध्ये घालण्यासाठी उरलेल्या 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि हिरव्या मिरच्या हे सुद्धा एकत्र कुटून वेगळं ठेवावं.
आता पनीर मधले सगळे पाणी काढून टाकावे. लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट, सैंधव, हळद, लाल मिरची पूड, धणे पूड व जिरे पूड घालून हलक्या हाताने पनीरला सगळे नीट लावून घ्यावे.
आता हे पनीर किमान 15 ते 30 मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी झाकून ठेवून द्यावे. आता सर्व भाज्या चिरून घ्याव्यात.
एखादी पसरट कढई किंवा पॅन तापवून त्यात 1 टेबलस्पून तेल घालावे. तेल तापल्यावर त्यात मॅरीनेट केलेले पनीरचे तुकडे घालावेत. मध्यम आचेवर 2 मिनिटात सगळीकडून किंचित लालसर सोनेरी रंगावर परतून घ्यावेत.
पनीर परतत असतानाच दुसऱ्या गॅसवर 2 कोळसे पेटण्यासाठी ठेवावेत. पनीर परतून झाले की एका ताटात काढून घ्यावे. ताटात मध्यभागी एक वाटी ठेवून त्यात पेटते कोळसे ठेवावेत. कोळशावर तूप घालून हे पनीरचे ताट पटकन पूर्ण झाकून घ्यावे. कोळशातून निघणारा धूर आतल्या आत राहून तो पनीरला व्यवस्थित लागायला हवा. यामुळे पनीरला खमंग बार्बेक्यू सारखी चव येईल.
आता ज्या कढईत पनीर परतून घेतले होते त्याच कढईत पुन्हा 2 टेबलस्पून तेल घालून त्यात आलं-लसूण-हिरवी मिरची यांचे कुटलेले मिश्रण घालावे.
लसणाचा उग्र वास थोडा कमी झाला की त्यात कांदा घालून परतून घ्यावा. कांदा किंचित मऊ झाल्यावर लगेच फरसबी व सिमला मिरची घालावी. मिनिटभर तीव्र आचेवर सगळ्या भाज्या सतत परताव्या. आता त्यात सैंधव व काळी मिरी पूड घालून थोडे परतून घ्यावे. आपल्याला भाज्या थोड्याच शिजवायच्या आहेत. खूप जास्त मऊ शिजू द्यायच्या नाहीत.
पनीरवरचे झाकण काढून कोळशाची वाटी बाजूला काढून ठेवावी. पनीरचे तुकडे भाज्यांमध्ये घालून तीव्र आचेवर अर्धा मिनिट परतावेत. गॅस बंद करून कढई खाली उतरवून घ्यावी. आता त्यावर बारिक उभा चिरलेला कोबी घालावा व कसुरी मेथी भुरभुरून घ्यावी.
पौष्टिक चमचमीत स्टर फ्राय पनीर खाण्यासाठी तयार. वर दिलेले प्रमाण 3-4 जणांसाठी पुरेसे आहे. हा पदार्थ वन-डिश-मिल किंवा साईड डिश म्हणूनही खाऊ शकता. पिवळी व लाल सिमला मिरची, फ्लॉवर, गाजर, हिरवे मटार उपलब्ध असल्यास घालू शकता.