साहित्य:
१ किलो चिकन, ४ मोठे कांदे उभे काप केलेले, पाव कप लसूण पेस्ट, १ टेबल स्पून आलं पेस्ट, १ टेबल स्पून हिरवी मिरची बारीक कुटलेली, दीड कप बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप भाजून बारीक केलेले सुके खोबरे, २ तमालपत्र, २ मसाला वेलदोडे, १ टेबलस्पून धणे, १ टेबलस्पून जिरं, १ इंच दालचिनीचा तुकडा, ६-७ लवंगा, १०-१२ काळी मिरी, १ बाद्यान (चक्रीफूल), ३ टीस्पून हळद, ३ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, बारीक कुटलेले जाडे मीठ चवीनुसार, तेल.
कृती:
प्रथम एक टीस्पून तेलावर खोबऱ्याचे तुकडे लालसर भाजून घ्यावेत. नंतर त्याच कढईत २ टेबलस्पून तेल घालून कांदे चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यावेत.
कांदे परतून होईपर्यंत एकीकडे मसाला वेलदोडे, धणे, जिरे, दालचिनी, लवंगा, काळी मिरी आणि बाद्यान ह्या खड्या मसाल्यांची एकत्र बारीक पूड करून घ्यावी. तोपर्यंत गार झालेले भाजलेले खोबरे आता बारीक करून घ्यावे.
खोबरे बारीक करून झाले की दुसरीकडे एका मध्यम आकाराच्या व जाड बुडाच्या कढईत २ टेबलस्पून तेल घालून गरम करावे. त्यात सगळे चिकन घालून त्यावर १ टीस्पून हळद आणि थोडेसेच मीठ घालावे व सगळे जरा हलवून घ्यावे. झाकण ठेवून मंद आचेवर १० मिनिटे चिकन शिजू द्यावे. पाणी घालण्याची आवश्यकता नाही कारण चिकनला पाणी सुटते व ते चिकन थोडे शिजण्यासाठी पुरेसे आहे. १० मिनिटांनी गॅस बंद करून चिकनची हि कढई खाली उतरवून ठेवा. (सगळे मीठ आता घालू नये. कारण नंतर पुन्हा मीठ घालायचे आहे.)
चिकन शिजायला ठेवेपर्यंत कांदा भाजून गार झालेला असेल. तो आता बारीक वाटून घ्यावा.
आता दुसऱ्या एका मोठ्या कढईत ४ टेबलस्पून तेल घालून ते तापले की त्यात २ तमालपत्र घाला. त्यावर कांद्याची पेस्ट घालून लगेच परता. आता त्यात लसूण पेस्ट, आलं पेस्ट घाला. आलं-लसूणाचा उग्र वास जाईपर्यंत परतून घ्या. एकीकडे ३ ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
आता कांद्यात हिरव्या मिरचीची पेस्ट घालून परता. त्यानंतर बारीक केलेलं खोबरं आणि खड्या मसाल्याची वाटलेली पूड घाला. २ टीस्पून हळद , लाल मिरची पूड, १ कप कोथिंबीर आणि मीठ घालून हा सगळा मसाला थोडासा परतून घ्या. गरम केलेले निम्मे पाणी घालून झाकण ठेवा.
२ मिनिटांनी झाकण काढून त्यात आधी अर्धवट शिजवलेले चिकन घालून वरून उरलेले गरम पाणी घाला. झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
आता गॅस बंद करून चिकन ग्रेव्ही वर उरलेली कोथिंबीर घाला व ५ मिनिटे झाकून ठेवा.