कुरडईचा उपमा

साहित्य: 10 कुरडया, दीड कप बारीक चिरलेला टोमॅटो, दीड कप बारीक चिरलेला कांदा,  दीड कपबारीक चिरलेली कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 8-10 कढीपत्त्याची पानं, 1 टीस्पून मोहोरी, 1 टेबलस्पून जिरं, दीड टेबलस्पून चाट मसाला, 1 टीस्पून हिंग, 4 टीस्पून सैंधव, जाडे मीठ चवीनुसार, तेल

कृती: 10 कुरडया बुडतील इतकं पाणी गरम करायला ठेवा. त्यात 1 टीस्पून तेल घाला. पाणी उकळलं की त्यात कुरडया घालून गॅस बंद करा. त्यावर झाकण ठेवा.

आता दुसऱ्या कढईत तेल तापवत ठेवा. तेलात मोहोरी टाकून ती तडतडली की जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची पानं घाला. आता या फोडणीत कांदा आणि नंतर हिरवी मिरची घाला. कांदा चांगला परतून घेतला की त्यात टोमॅटो घाला. थोडावेळ परतून त्यात सैंधव, जाडे मीठ आणि चाट मसाला घाला.

एवढ्या वेळात कुरडया छान शिजल्या असतील. त्या चाळणीवर ओतून त्यातलं पाणी नीट निथळून घ्या. आता या कुरडया कांदा टोमॅटोच्या मिश्रणात घाला.

अगदी हलक्या हाताने कुरडया हलवा. कुरडईला सगळीकडे मसाला लागायला हवा. दोन मिनिटं मध्यम आचेवर कुरडया मसाल्यात मुरू द्या. झाकण ठेवू नका.

आता गॅस बंद करून कोथिंबीर घालून हलकेच उपमा हलवून घ्या.

वर दिलेल्या प्रमाणात साधारण 3 ते 4 जणांचा नाश्ता होतो.

Share your love